बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट असे आहेत जे चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यावर फ्लॉप झाले मात्र नंतर हेच सिनेमे प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरले. टीव्हीवर लागल्यावर या सिनेमांना चांगलाच प्रतिसाद मिळाला. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे 'शोले'. रमेश सिप्पी यांच्या या सुपरहिट सिनेमाकडे सुरुवातील प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. पण नंतर मात्र हा सिनेमा हिट झाला. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि धर्मेंद्र यांची यामध्ये मुख्य भूमिका होती. अमिताभ बच्चन यांचा असा आणखी एक सिनेमा आहे जो थिएटरमध्ये तर फ्लॉप झाला तरी आता मात्र टीव्हीवर तो सतत लागलेला असतो आणि लोक तो कितीदाही पाहून कंटाळत नाही. विशेष म्हणजे हा सिनेमा शाहरुख, सलमान आणि आमिरसह तब्बल १३ अभिनेत्यांनी नाकारला होता.
21 मे 1999 साली रिलीज झालेला अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम' (Sooryavansham) सिनेमा अगदी रोजच टीव्हीवर लागलेला असतो. बॉक्सऑफिसवर सिनेमाला फारसं यश मिळालं नसलं तरी जेव्हापासून सिनेमा टीव्हीवर आला आहे तो सुपरहिट ठरला आहे. तब्बल २५ वर्षांपासून हा सिनेमा अगणित वेळा टीव्हीवर दाखवला गेला आहे. ईवीवी सत्यनाराण दिग्दर्शित हा सिनेमा फॅमिली ड्रामा होता. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा डबल रोल होता. वडील आणि मुलाची भूमिका त्यांनीच साकारली होती. आजही प्रत्येक वयोगटातील लोक हा सिनेमा आवडीने पाहतात. सिनेमा अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अनुपम खेर, कादर खान, सौंदर्या आणि रचना बॅनर्जी यांच्या भूमिका होत्या.
अशा या चर्चेतील सिनेमासाठी अमिताभ बच्चन पहिली पसंत नव्हते. माध्यम रिपोर्टनुसार,सिनेमातील हिरा ठाकूरची भूमिका बच्चन यांच्याआधी तब्बल १३ अभिनेत्यांना ऑफर झाली होती. यामध्ये गोविंदा, मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, सनी देओल, संजय दत्त, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी, सैफ अली खान यांच्यासह काही कलाकारांचा समावेश आहे. या सर्वांनी सिनेमा नाकारल्यानंतर शेवटी अमिताभ बच्चन यांना विचारण्यात आले. सिनेमाची कहाणी तर दमदार होती पण बॉक्सऑफिसवर सिनेमा आपटला.
अमिताभ बच्चन तेव्हा 57 वर्षांचे होते. त्यांनी वडिलांची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली. मात्र मुलाच्या भूमिकेत ते फारसे उठून दिसले नाहीत. तसंच सौंदर्यासोबत त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आधी फार आवडली नाही. कदाचित याच कारणांमुळे सिनेमा फ्लॉप झाला.