रोमान्सचा बादशाह शाहरुख खान आणि प्रिती झिंटा यांचा ‘वीरझारा’ हा चित्रपट विसरता येण्यासारखाचं नाही.‘वीरझारा’ आठवण्याचे कारण म्हणजे, आज या चित्रपटाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत.२००४ साली आजच्याच दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रिती झिंटाने ‘वीरझारा’ला १४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रितीने या चित्रपटातील ‘तेरे लिये हम है जिये’ या गाण्याचा एक व्हिडिओ शेअर करून आठवणींना उजाळा दिला आहे.
‘या चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. हा चित्रपट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे’, असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. शिवाय यश चोप्रा यांच्या स्मृतींही जागवल्या आहेत. यश चोप्रा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. प्रेमाला सीमा नसतात. कोणतीही सीमारेषा प्रेमभावनेला रोखू शकत नाही,हा संदेश त्यांनी या चित्रपटातून दिला होता.‘वीरझारा’ या चित्रपटात शाहरुख आणि प्रिती मध्यवर्ती भूमिकेत होते. भारतात राहणारा आर्मी आॅफिसर वीर आणि पाकिस्तानी मुलगी झारा यांची ही लव्हस्टोरी तुफान गाजली होती. चित्रपटात दोघांच्याही प्रेमाची आणि विरहाची कहाणी दाखवली होती. शाहरूख-प्रितीशिवाय राणी मुखर्जी, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, मनोज वाजपेयी, बोमन इराणी, अनुपम खेर, दिव्या दत्ता आणि जोरा सहगल यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रीय झाली होती. जावेद अख्तर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीतांना मदन मोहन यांनी संगीत दिले होते. आजही ही गाणी लोकांच्या कानात रूंजी घालतात.