KGF 2: कन्नड सुपरस्टार यशचा ( Yash) ‘केजीएफ 2’ (KGF Chapter 2) या चित्रपटाची प्रतीक्षा करून करून चाहते थकले होते. अखेर, दीर्घ प्रतीक्षेनंतर हा सिनेमा गेल्या 14 एप्रिलला चित्रपटगृहांत धडकला आणि रिलीज होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. अगदी पहिल्याच दिवशी साऊथच्या या सिनेमानं अख्ख बजेट वसूल केलं आणि बघता बघता चारच दिवसांत 550 कोटींवर कमाई केली. या चित्रपटाबद्दल एक फक्कड बातमी आहे. कदाचित पहिल्याप्रथम तुम्हालाही यावर विश्वास बसणार नाही. होय, यशचा हा 300 करोडी सिनेमा 19 वर्षांच्या एका मराठमोळ्या पठ्ठयानं एडिट केला आहे. त्याचं नाव उज्ज्वल कुलकर्णी.
दिग्दर्शक प्रशांत नील (Prashanth Neel) यांनी इतक्या मोठया सिनेमाची जबाबदारी एका 19 वर्षांच्या मुलावर सोपवावी, याचं अनेकांना आश्चर्य वाटतंय. पण हे खरं आहे. 19 वर्षांचा उज्ज्वल मस्ती मस्तीत शॉर्ट फिल्म्स एडिट करायचा. अनेक गाजलेल्या सिनेमांचे सीन्स एडिट करायचा. पण एडिटींग इतकी जबरदस्त की पाहून सगळेच त्याचं कौतुक करायचे. त्याची हीच कीर्ती ‘केजीएफ 2’चे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या कानावर गेली.
उज्ज्वलचं काम त्यांना इतकं आवडलं की, त्यांनी थेट ‘केजीएफ 2’च्या ट्रेलरच्या एडिटींगची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवली. उज्ज्वलनं ‘केजीएफ 2’चं ट्रेलर कट करून प्रशांत नील यांना दाखवला. तो ट्रेलर पाहून प्रशांत नील इतके प्रभावित झालेत की, त्यांनी अख्ख्या चित्रपटाच्या एडिटींगचा भार उज्ज्वलच्या खांद्यावर टाकला.इतक्या छोट्या वयाच्या उज्ज्वलचं काम पाहून सुपरस्टार यशही खूश्श झाला. समीक्षकही ‘केजीएफ 2’च्या एडिटींगचं विशेष कौतुक करत आहेत. हीच उज्ज्वलच्या कामाला मिळालेली पावती आहे.
चारच दिवसांत 500 कोटींपारसाऊथ सुपरस्टार यशचा ‘केजीएफ 2’ बॉक्स ऑफिसवर सूसाट पळतोय. होय, पहिल्या दोनच दिवसांत जगभरात 270 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने रविवारपर्यंत 550 कोटींपेक्षा अधिकचा बिझनेस केला आहे. अगदी ‘केजीएफ 2’ त्सुनामी बनून बॉक्स ऑफिसवर धडकला आहे आणि ही त्सुनामी ‘आरआरआर’पेक्षाही विराट असल्याचं चित्र आहे. ‘आरआरआर’ने काहीच दिवसांपूर्वी वर्ल्डवाईड 1000 कोटींपेक्षा अधिकची कमाई केली होती. अद्यापही आरआरआर गर्दी खेचतोय. पण त्याच्यामागून आलेला ‘केजीएफ 2’ या सिनेमाच्या कमाईचा वेग चकीत करणारा आहे. चारच दिवसांत या सिनेमाने 500 कोटींचा आकडा पार केला आहे.
ट्रेड अॅनालिस्ट मनोबाला विजयबालनने ‘केजीएफ 2’च्या कमाईचे ताजे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार, या चित्रपटाने फक्त चार दिवसांत जगभरात 552 कोटींचा बिझनेस केला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 165.37 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 139.25 कोटी कमावले. तिसऱ्या दिवशी 115.08 कोटींचा बिझनेस केला आणि चौथ्या दिवशी म्हणजेच काल रविवारी 132.13 कोटींचा गल्ला जमवला. हा एकूण आकडा 551.83 कोटी आहे.