बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांनी आजपर्यंत एकत्र काम केलेले नाही. गेल्या काही वर्षांपासून ते प्रयत्न करत आहेत मात्र अजूनही शक्य झालेले नाही. एका मुलाखतीत विधू विनोद चोप्रा यांनी खुलासा करत सांगितले की त्यांनी 1994 साली शाहरुखला एक सिनेमा ऑफर केला होता तो म्हणजे '1942 अ लव स्टोरी'. या सिनेमातीलअनिल कपूर आणि मनीषा कोईरालामधील केमिस्ट्री खूप चर्चेत होती.
1994 मध्ये आलेली सुपरहिट रोमँटिक फिल्म म्हणजे '1942 अ लव स्टोरी'. सिनेमाची स्टोरी, गाणी, अनिल कपूर-मनीषा कोईरालाची जोडी सगळंच प्रेक्षकांना खूप आवडलं. पण यामध्ये अनिल कपूरच्या जागी शाहरुख खान दिसला असता. याविषयी सांगताना विधू विनोद चोप्रा म्हणाले, "शाहरुखसोबत माझा इतिहास आहे. जेव्हा मी '1942 अ लव स्टोरी' वर काम करत होतो तेव्हा मी शाहरुखला पाहिलं होतं. माझी एक्स वाईफ रेनूने शाहरुखच्या 'मेमसाहब' सिनेमाचं एडिटिंग केलं होतं. यात शाहरुखचा तसा छोटासाच रोल होता. पण त्याचं तेच काम पाहून मी त्याला माझ्या सिनेमात भूमिका ऑफर केली होती. त्याला सिनमात लीड रोल ऑफर करणारा मी पहिलाच व्यक्ती होतो. तेव्हा तो काही स्टार वगरे नव्हता. त्याने सिनेमाला नकार दिला आणि मी अनिल कपूरला कास्ट केलं."
इतकंच नाही तर या सिनेमासाठी मनीषा कोईरालाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला विचारणा झाली होती. ती म्हणजे 'धकधक गर्ल'माधुरी दीक्षित. मात्र ती सिनेमात काम करु शकली नाही आणि मनिषाची एन्ट्री झाली. सिनेमात जॅकी श्रॉफचीही मुख्य भूमिका होती.
विशेष म्हणजे विधू विनोद चोप्रा यांच्या निर्मितीखाली बनलेली'मुन्नाभाई एमबीबीएस'ही फिल्मही शाहरुख खानला ऑफर केली होती. मात्र सर्जरीच्या कारणामुळे त्याने नकार दिला होता. राजकुमार हिरानी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. नंतर संजय दत्तने मुन्नाभाई साकारत वाहवाही मिळवली.