वॉर सिनेमातलं टायगर श्रॉफचे काम अविस्मरणीय होते आणि अॅक्शन सीन्स करण्याचे त्याचे कौशल्य पाहिल्यावर तो भारतीय सिनेमांच्या इतिहासातला सर्वात मोठा अॅक्शन स्टार असल्याचे सिद्ध झाले. या सिनेमाला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने टायगरने यश राज फिल्म्सच्या वॉरचे त्याच्या सिनेमांच्या यादीतले स्थान काय आहे हे उलगडले.
टायगर श्रॉफ म्हणाला, ‘वॉर सिनेमाने भारतातील अॅक्शन सिनेमांचा मापदंड नव्या उंचीवर नेला. मी केलेल्या सिनेमांमध्ये या सिनेमाचा समावेश असल्याचा मला अभिमान वाटतो आणि या खास सिनेमात संधी दिल्याबद्दल मी दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि निर्माता आदित्य चोप्रा यांचा आभारी आहे. विशेषतः त्यांनी मला माझा पडद्यावरचा आदर्श- हृतिक रोशनबरोबर काम करण्याची संधी दिल्याबद्दल.’
टायगर पुढे म्हणाला, ‘वॉर सिनेमाने मला पडद्यावर करता येऊ शकणाऱ्या अॅक्शन सीन्सची पातळी उंचावण्यास मदत केली आणि या आव्हानाचा मी मनापासून आनंद घेतला. शरीराने मी जखमी होतो, थकलेलो होतो, पण ते सगळे वेगळाच आनंद देणारे होतं. या सिनेमाला प्रत्येक ठिकाणाहून मिळालेले प्रेम आणि प्रशंसेने मी भारावून गेलो आहे.’
वॉरमध्ये टायगरने बुद्धीमान अंडरकव्हर ऑपरेटिव्ह खालिदची भूमिका केली आणि त्याने गुरुत्वाकर्षणाला हरवत मृत्यूचा थरार दाखवणारे स्टंट्स लीलया केले. त्यातला सर्वात अवघड अॅक्शन सीन कोणता होता असे विचारल्यावर टायगर म्हणाला, ‘हे सांगणे कठीण आहे. पण मी म्हणेन, की सिनेमात माझा परिचय करून दिला जातो, तेव्हा दिग्दर्शकाने सीन कट न करता हाताने मारामारी करत रहाणे हा मी केलेला आतापर्यंतचा सर्वात अवघड सीन होता.’
तो पुढे म्हणाला, ‘त्या सीनने मला श्वास रोखून धरायला लावणारे काहीतरी मोठ्या पडद्यावर उभे करण्यासाठी प्रेरणा दिली. हा सीन माझ्या कायम लक्षात राहील. वॉर सिनेमाने मला आजवर कधी न पाहिलेल्या रूपात सादर केले आणि माझ्यावर इतका विश्वास टाकल्याबद्दल मी निर्मात्यांचा आभारी आहे. या सिनेमाने मला खूप प्रेम दिले आणि खरंतर माझे आयुष्य अवघड केले, कारण आता अॅक्शन सीन्स करताना दरवेळेस मला माझ्यापेक्षाच चांगली कामगिरी करावी लागते.’
वॉरमध्ये टायगर श्रॉफ आणि त्याचा पडद्यावरचा आदर्श हृतिक रोशन यांना एकमेकांच्या विरोधात उभे केले. तो म्हणाला, ‘हृतिक माझ्यासाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे. मला त्याच्याबरोबर काम करायलाच नव्हे, तर नृत्य करायलाही मिळणार या कल्पनेने मी हरखून गेलो होतो.कलेप्रती त्याची शिस्त आणि समर्पण कलाकार महान का बनतात याची साक्ष देणारे आहे. त्याच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक दिवशी मी खूप काही शिकलो. त्याच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा होती आणि वॉरने ती पूर्ण केली. हे शक्य करणाऱ्या प्रत्येकाचा मी कृतज्ञ राहीन.’