रजनीकांत आणि अक्षय कुमारचा ‘2.0’चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झालाय. पण तो रिलीज होण्याआधी प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. पहिला शो सुरू होण्यापूर्वी या चित्रपटाची 1.2 मिलियन म्हणजे 12 लाख तिकिटे विकली गेलीत. केवळ इतकेच नाही तर लोक अगदी वाजत गाजत फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला पोहोचले होते आणि आता तर या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बक्कळ कमाई केली आहे.
2.0 या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत १०० कोटींचा गल्ला जमवला आणि दिवसेंदिवस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई करत असून चार दिवसांमध्ये या चित्रपटाने ४०० कोटीहून अधिक पैसा कमावला आहे. ट्रेड एक्स्पर्ट रमेश बाला यांनी ट्वविटरद्वारे ही माहिती दिली आहे. या चित्रपटाने आजवरचे अनेक बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड मोडले आहेत.
2.0 हा चित्रपट रजनीकांत यांच्या रोबोट या चित्रपटाचा सिक्वल असून या चित्रपटाने विक्रमी कमाई केली होती. आता २.0 ने रोबोटचा देखील रेकॉर्ड मोडला असून हा चित्रपट हिंदी, तामीळ अशा पंधरा भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी २०.२५ कोटी तर दुसऱ्या दिवशी १८ कोटी, शनिवारी २५ कोटी अशी कमाई केली आहे.
2.0 हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक महागडा चित्रपट आहे. केवळ चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर 550 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या चित्रपटात रजनीकांत यांनी चिट्टी रोबोटची भूमिका साकारली असून अक्षय पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
2.0 च्या फर्स्ट डे फर्स्ट शोला चाहत्यांचा उत्साह असा ओसंडून वाहत होता. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींलाही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. ट्रेड एक्स्पर्ट रमेश बाला यांनी ट्विटर या अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, बुक माय शोच्या संकेतस्थळावर या चित्रपटाच्या अॅडव्हॉन्स बुकींगदरम्यान 12 लाख तिकिटे विकली गेली होती. यावरून या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई किती होणार याचा अंदाज आधीच आला होता.