25 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 5 ऑगस्ट 1994 रोजी ‘हम आपके है कौन’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या स्मृती आजही ताज्या आहेत. हा फॅमिली ड्रामा इतका सुपरहिट झाला की, या चित्रपटाने केवळ सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांनाच नाही तर चित्रपटातील प्रत्येक कलाकाराला नवी ओळख दिली. चित्रपटातील डॉगी ‘टफी’ हाही भाव खाऊन गेला. 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज मुंबईत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले आहे. आम्ही मात्र यानिमित्ताने या चित्रपटाबद्दलचे काही रोचक किस्से तुम्हाला सांगणार आहोत.
‘हम आपके है कौन’ हा सिनेमा सूरज बडजात्या यांनी दिग्दर्शित केला होता. सूरज यांचे आजोबा ताराचंद बडजात्या या चित्रपटाचे निर्माते होते. या चित्रपटात अनेक नव्या गोष्टी होत्या. उदाहणार्थ काही सीक्वेंस गाण्यात शूट केले गेले होते. असाच एक सीक्वेंस ‘धिकताना धिकताना’ या गाण्यात होता. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर सूरज बडजात्या यांनी तो आपल्या आजोबांना दाखवला. आजोबांना ‘धिकताना धिकताना’ हे गाणे आणि सीक्वेंस इतके आवडले की, या चित्रपटाचे नाव ‘धिकताना’ ठेवावे, असा हट्ट त्यांनी धरला. सूरज बडजात्या यांनी अनेकदा समजवल्यानंतर त्यांनी हा हट्ट सोडला आणि ‘हम आपके है कौन’ या नावाने हा सिनेमा प्रदर्शित झाला.
या चित्रपटात एकूण 14 गाणी होती. यातील सगळ्यांत लोकप्रिय गाणे म्हणजे, ‘दीदी तेरा देवर दीवाना.’ चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर राम-लक्ष्मण यांना नुसरत फतेह अली यांच्या ‘सारे नबियां’ या गाण्यावरून ‘दीदी तेरा देवर दीवाना’ची कल्पना सुचली होती, असे म्हणतात.
‘हम आपके है कौन’च्या शूटींगदरम्यान अनुपम खेर यांना फेशिअल पॅरालिसिसचा अटॅक आला होता. पण असे असूनही अनुपम खेर यांनी आधी शूटींग पूर्ण केले आणि नंतर उपचार घेतले. दोन महिने ते यावर उपचार घेत होते.
या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांनाच नाही तर महान चित्रकार एम. एफ हुसैन यांनाही वेड लावले होते. हा सिनेमा त्यांना इतका आवडला होता की त्यांनी तो 70 पेक्षा अधिक वेळा पाहिला. यानंतर माधुरीचे अनेक पोस्टर्स त्यांनी चितारली. माधुरीला घेऊन त्यांनी ‘गजगामिनी’ नावाचा एक चित्रपटही बनवला.या चित्रपटासाठी माधुरीला सलमानपेक्षा अधिक फी मिळाली होती. माधुरीने यासाठी 2 कोटी 75 लाख फी घेतली होती. त्याकाळात ही खूप मोठी रक्कम होती.