२५ जानेवारी! अखेर ‘पद्मावत’ची रिलीज डेट ‘लॉक’; बॉक्सआॅफिसवर रंगणार ‘पद्मावत’ विरूद्ध ‘पॅडमॅन’ मुकाबला!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2018 10:31 AM
अखेर ‘पद्मावत’ (पद्मावती)ची रिलीज डेट आलीच. होय, येत्या २५ तारखेला ‘पद्मावत’ रिलीज होणार आहे. शूटींग सुुरू झाल्यापासून हा चित्रपट ...
अखेर ‘पद्मावत’ (पद्मावती)ची रिलीज डेट आलीच. होय, येत्या २५ तारखेला ‘पद्मावत’ रिलीज होणार आहे. शूटींग सुुरू झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. गेल्या महिनाभरापासून हा वाद विकोपाला पोहोचला होता. या वादामुळे चित्रपटाची रिलीज डेट रखडली होती. खरे तर ‘पद्मावत’आधी १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र सातत्याने चित्रपटाला होणा-या विरोधामुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. करणी सेनेसारख्या राजपूत संघटनांनी हा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. अखेर, हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला होता. सुप्रीम कोर्टाने या वादाचा चेंडू सेन्सॉर बोर्डाच्या कोर्टात टोलवला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने पाच कट्ससोबत चित्रपटाला हिरवी झेंडी दिली. तोडगा काढण्याच्या प्रयत्नात ‘पद्मावती’चे नाव बदलून ‘पद्मावत’ करण्यावरही भन्साळी राजी झालेत. एवढेच नाही तर चित्रपटातील ‘घूमर’ गाण्यात काही बदल करण्याची तयारीही भन्साळींनी दर्शवली आणि ‘पद्मावत’च्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला. आता हा चित्रपट २५ तारखेला रिलीज होईल. याच तारखेला अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ रिलीज होत आहे. ‘पॅडमॅन’ आधी २६ तारखेला रिलीज होणार होता. पण ऐनवेळी ही तारीख बदलून २५ करण्यात आली. त्यामुळे ‘पद्मावत’ विरूद्ध ‘पॅडमॅन’ असा मुकाबला बॉक्सआॅफिसवर पाहायला मिळणार आहे.‘पद्मावत’मध्ये राणी पद्मावतीची भूमिका दीपिका पादुकोणने साकरली आहे. शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. तर रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग प्रथमच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी शाहिद कपूरने सहा प्रकारच्या तलवार बाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. ALSO READ : करणी सेनेचा आरोप; अंडरवर्ल्डच्या दबावामुळेच सेन्सॉरने ‘पद्मावती’ला दाखविला हिरवा कंदील !भन्साळींना ‘पद्मावती’ बनवण्यास जवळपास दोन वर्षे लागलीत. पण पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट वादात सापडला आहे. चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत, सर्वप्रथम राजपूत करणी सेनेने या चित्रपटाच्या सेटवर धिंगाणा घातला. यावेळी भन्साळींना मारहाणही करण्यात आली. यानंतर चित्रपटाचा सेट कोल्हापुरात हलवण्यात आला. पण इथेही काही अज्ञातांनी सेटवर आग लावली. आता तर हा चित्रपट रिलीज होऊच देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.