Join us

बॉलिवूडकरांनी २६/ ११च्या हल्ल्यातील शहीदांना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 5:46 PM

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याला आज १२ वर्षे पूर्ण झाली आहेत.

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता. हल्ल्यानंतर मुंबईसह संपूर्ण देश हादरला होता. या दहशतवादी हल्ल्यांत १६० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. या भ्याड हल्ल्याला आज १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने बॉलिवूडमधील कलाकारांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता अक्षय कुमारने शहीदांना श्रद्धांजली देत लिहले की, ‘२६/११ हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाहीत. शहीद आणि पीडितांना माझ्याकडून श्रद्धांजली! ज्यांनी या हल्लात स्वत:चा विचार न करता सर्वोच्च बलिदान दिले, त्यांचा मी नेहमीच ऋणी असणार आहे.

अभिनेता रणवीर शौरीने ट्विट करत म्हटले आहे की, “ही घटना कधीही विसरणार नाही आणि त्यांना कधीही माफ करू शकणार नाही.”

शिल्पा शेट्टीने देखील ट्विट करत म्हटले की, ‘या हल्ल्यामुळे बदललेल्या प्रत्येक जीवनासाठी शांती मिळावी यासाठी शहीदांना श्रद्धांजली!’

या व्यतिरिक्त इतर बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली

२६ नोव्हेंबर, २००८ च्या रात्री दहशतवाद्यांनी मुंबईत एकाच वेळी दहा ठिकाणी हल्ला केला. यामध्ये दक्षिण मुंबई येथी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या परिसरात हल्ले झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट घडवून आणला होता. हल्ले करणाऱ्या १० पैकी ९ दहशतवाद्यांना मुंबई पोलीस आणि एनएसजीच्या कमांडोंनी कंठस्नान घातले तर अजमल आमीर कसाब हा दहशतवादी पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते आणि या हल्ल्यांमागे लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता.

टॅग्स :अक्षय कुमार26/11 दहशतवादी हल्लाशिल्पा शेट्टीरणवीर शौरीअभिषेक बच्चन