बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ला आज २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आणि काजोल यांच्यातील केमिस्ट्रीने रंगलेल्या या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान कायम ठेवलं आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट विसरणं सिनेप्रेमींसाठी केवळ अशक्य. हा चित्रपट चाहते कधीही, केव्हाही आणि कितीही वेळा पाहू शकतात.
या चित्रपटाला 28 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिनेमांच्या अनेक आठवणींना उजळा मिळतोय. 'सिमरन' अर्थात काजोलने एक खास व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये काजोल 'सिमरन'च्या लूकमध्ये दिसत आहे. डीडीएलजेमधील ऑयकॉनिक हिरव्या रंगाच्या ड्रेसचा आहे, जो तिने चित्रपटात घातला होता.
काजोलने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आजही हिरवा रंग घातलाय, पण तो शेड नाही. 28 वर्षांनंतरही डीडीएलजे प्रेक्षकांचा आहे. हा चित्रपट एक वारसा बनलाय, ज्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती'. या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. या चित्रपटात शाहरूख खान आणि काजोल सोबतच अमरीश पुरी, फरीदा जलाल आणि अनुपम खेर हेदेखील प्रमुख भूमिकेत दिसून आले होते.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट 20 ऑक्टोबर 1995 रोजी रिलीज करण्यात आला होता. प्रसिद्ध चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. राज आणि सिमरनची प्रेमकहानी आजही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. या सिनेमातील गाण्यांना आजही तरुणांची पसंती असल्याचं पाहायला मिळतं. शाहरुख – कोजाल फक्त रिल लाईफमध्येच नाही तर, रिअल लाईफ मध्ये देखील चांगले मित्र आहेत.