'थ्री इ़डियट्स' हा सुपरहिट सिनेमा तीन मित्रांवर आधारित होता. फरहान, राजू आणि रँचो. आपलं स्वप्न आणि ते साकार करण्यासाठीची धडपडही यात दाखवण्यात आली होती. या तिघांमधील एक मित्र म्हणजे राजू रस्तोगी आठवतोय? अभिनेता शर्मन जोशीने राजूची भूमिका साकारली होती. राजूचं घर ब्लॅक अँड व्हाईट काळातलं दाखवण्यात आलं होतं. तर राजूची आईही आता डोळ्यासमोर आली असेलच. अभिनेत्री अमरदीप झा (Amardeep Jha) यांनी ही भूमिका साकारली होती. अमरदीप झा यांच्या खऱ्या आयुष्यातील लेकीला पाहिलंय का?
राजू रस्तोगीच्या ब्लॅक अँड व्हाईट घरात त्याची आई, बहीण आणि पॅरेलिसिस झालेले वडील राहत असतात. पनीरचा भाव सोन्याच्या भावाएवढा झाल्याचं त्याची आई सांगते तो सीन कोणीच विसरु शकत नाही. ही भूमिका साकारणाऱ्या अमरदीप झा या गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहेत. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत त्यांनी काम केलंय. शिवाय 'दिल से दिल तक','बा बहू और बेबी','एक हजारो मे मेरी बहना है' या मालिकांमध्येही काम केलं आहे. याशिवाय त्यांनी चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन, अजय देवगण सह अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. 1998 साली त्यांनी 'दुश्मन' सिनेमातून पदार्पण केलं होतं.
कोण आहे अमरदीप झा यांची मुलगी?
अमरदीप झा यांच्या लेकीचं नाव श्रिया आहे. ती देखील आईच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेइंडस्ट्रीत आली आहे. ती दिसायला खूपच सुंदर आहे. 2008 साली 'गीता' या सिनेमातून श्रियाने तेलुगू सिनेमातून पदार्पण केलं. यानंतर तिने बंगाली सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. अमरदीप झा यांच्या पतीचं निधन खूप लवकर झालं. त्यांनी एकटीनेच लेकीचा सांभाळ केला. श्रियालाही आईने केलेल्या मेहनतीची जाणीव आहे. ती देखील आता अभिनयात चांगलं काम करुन आईचं नाव उंचावत आहे.