अमिताभ बच्चन स्टारर ‘लावारिस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आज २२ मे रोजी ३८ वर्षे पूर्ण झालीत. २२ मे १९८१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लोकांनी हा सिनेमा अक्षरश: डोक्यावर घेतला होता. याच चित्रपटाशी जुळलेल्या काही रोचक गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
या चित्रपटात अमिताभसोबत जीनत अमान लीड रोलमध्ये होती. पण जीनतआधी मेकर्सची पहिली पसंत परवीन बॉबी होती.
या चित्रपटात अभिनेत्री राखीने पहिल्यांदा अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका साकारली होती. त्याआधी अनेक चित्रपटात हीच राखी अमिताभची हिरोईन होती. ‘लावारिस’मध्ये राखी अमिताभची आई बनली आणि पुढे मायलेकाची ही रिल लाईफ जोडी अनेक चित्रपटांत दिसली.
या चित्रपटात अमजद खान, सुरेश ओबेरॉय, बिंदू, ओम प्रकाश आणि रंजीत मुख्य भूमिकेत होते. याशिवाय प्रीति सप्रू ही सुद्धा यात होती. अर्थात ती साईड रोलमध्ये असल्याने अनेकांचे तिच्याकडे लक्ष गेले नाही. प्रकाश मेहरा हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.
‘लावारिस’मधील ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ हे गाणे प्रचंड गाजले होते. आजही लोक हे गाणे विसरलेले नाहीत. पण या गाण्यामुळेच जया बच्चन अमिताभ यांच्यावर जाम संतापल्या होत्या. खुद्द अमिताभ यांनी कौन बनेगा करोडपती या शोमध्ये याचा खुलासा केला होता. ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ या गाण्यात अमिताभ महिलेच्या गेटअपमध्ये दिसले होते. अमिताभ यांना असे पाहून जया भडकल्या होत्या. तुम्ही हे काय करताय. बायकांचे कपडे घालून नाचताय, तुम्हाला हे शोभते का, असे जयांनी अमिताभ यांना सुनावले होते. यानंतर अमिताभ यांनी कधीच कुठल्या चित्रपटात महिलांचे गेटअप घेतले नाही.