Join us

‘पाहू नका’चे पोस्टर्स लागूनही ‘निकाह’ पाहण्यासाठी लागल्या होत्या रांगा

By रूपाली मुधोळकर | Published: September 24, 2020 8:17 PM

‘निकाह’ला 38 वर्षे पूर्ण! एकीकडे ‘पाहू नका’चे पोस्टर्स अन् दुसरीकडे ‘हाऊसफुल’चे बोर्ड

ठळक मुद्देसलमा आगा यांनी ‘निकाह’मध्ये साकारलेली निलोफरची भूमिका अजरामर केली.

सलमा आगा, राज बब्बर आणि दीपक पाराशर यांचा ‘निकाह’ हा एकेकाळचा जबरदस्त गाजलेला सिनेमा. हा सिनेमा आठवायचे कारण म्हणजे, आज या सिनेमाला 38 वर्षे पूर्ण झालीत. 38 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 24 सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सलमा आगाने साकारलेली निलोफर आणि राज बब्बर यांनी साकारलेला हैदर या दोघांची पडद्यावरची रोमॅन्टिक केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.

या सिनेमाचे नाव आधी ‘तलाक तलाक तलाक’ ठेवले होते. पण ऐनवेळी हे नाव बदलून ‘निकाह’ असे नामकरण करण्यात आले.  ‘तलाक तलाक तलाक’वरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे वादाच्या भीतीने या सिनेमाला ‘निकाह’ नाव देण्यात आले होते. पण इतके करूनही हा सिनेमा तयार करताना दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते.होय, अगदी सिनेमाचे शूटींग सुरु होण्यापूर्वीच अनेक लोकांनी या सिनेमाविरोधात कोर्टात धाव घेतली होती. कसाबसा हा सिनेमा पूर्ण झाला आणि रिलीजही झाला. पहिल्याच दिवशी मुंबईसह देशाच्या अनेक चित्रपटगृहांबाहेर सिनेमा पाहण्यासाठी लोकांच्या अक्षरश: रांगा लागल्या, पण म्हणून समस्या संपल्या नव्हत्या...

तरीही झकळले ‘हाऊसफुल’चे बोर्डसिनेमा रिलीज झाल्यानंतर दोन दिवसांनी काही मुस्लिम संघटनांनी ‘निकाह’ बघू नका, अशा आशयाचे पोस्टर लावले होते. अर्थात चित्रपटगृहांबाहेरच्या या पोस्टर्सचा प्रेक्षकांवर काहीही परिणाम झाला नाही. चित्रपटाची कथा, संवाद आणि गाण्यांनी अशी काही धूम केली की, बहुतांश चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुलचे बोर्ड झळकले होते.‘निकाह’ची कथा अचला नायर यांनी लिहिली होती. यासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पटकथा लेखिकेचा पुरस्कार मिळाला होता.

अन् चित्रपटाला ‘निलोफर’ मिळाली...पाकिस्तानी वंशाच्या बॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका सलमा आगा यांनी ‘निकाह’मध्ये साकारलेली निलोफरची भूमिका अजरामर केली. सलमा आगा व बी. आर. चोप्रा यांची भेट ऋषी कपूर - नीतू सिंग यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये झाली होती. या रिसेप्शनला सलमा आगा यांनाही निमंत्रित केले गेले होते. याचठिकाणी बी़ आर यांनी पहिल्यांदा सलमा यांना पाहिले. येथून सलमा यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली. विशेष म्हणजे, ‘निकाह’ची चार गाणी खुद्द सलमा यांनी गायली होती. सलमा आगा यांचे ‘दिल के अरमा आसुओं में बह गए’ हे गाणे प्रचंड गाजले होते.  या गाण्यासाठी सलमा यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता.

टॅग्स :राज बब्बरबॉलिवूड