Join us

असा होणार भारताचा 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; गाईड चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 7:06 PM

गोव्यात 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

गोव्यात 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा महोत्सव 28 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. देव आनंद यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त या महोत्सवात 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या गाईड या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग होणार आहे.

याबाबत माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, 'भारत हा जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्मिती करणारा देश आहे. या देशातील चित्रपट आणि मीडिया इंडस्ट्री जगात खूप मोठी आहे. पायरसीविरुद्धच्या लढाईत भारत संपूर्ण जगाच्या चित्रपट उद्योगासोबत उभा आहे. G20 च्या यशस्वी आयोजनानंतर पुन्हा एकदा जगातील देश या महोत्सवासाठी गोव्यात येत आहेत'.

या चित्रपट महोत्सवात जगप्रसिद्ध अभिनेते मायकेल डग्लस यांना 'सत्यजित रे लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन सिनेमा" प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार 2021 पासून सुरू करण्यात आला असून चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांना हा सन्मान देण्यात येतो. तर 105 देशांमधून 2962 चित्रपटांची एन्ट्री झाली आहे. 

 1952 मध्ये सुरू झालेला IFFI हा आशियातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा चित्रपट महोत्सव मानला जातो. हा महोत्सव दरवर्षी गोव्यात आयोजित केला जातो जिथे सर्वोत्तम चित्रपट दाखविले जातात. गोवा सरकार, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन करते.

टॅग्स :इफ्फीसेलिब्रिटीसिनेमागोवा