Filmfare Awards 2019: रणवीर सिंगने शेअर केला तालमी दरम्यानचा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 06:40 PM2019-03-23T18:40:03+5:302019-03-23T18:41:28+5:30
तालमी दरम्यानचा रणवीर सिंगचा एक बुमरँग व्हिडिओ नुकताच फिल्मफेअरने त्यांच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्याच्यासोबत आपल्याला मॉनी रॉय दिसत आहे.
फिल्मफेअर पुरस्काराची वाट बॉलिवूडमधील मंडळी आणि प्रेक्षक वर्षभर पाहात असतात. हा पुरस्कार सोहळा २३ मार्चला म्हणजेच आज मुंबईतील जिओ गार्डन येथे होणार आहे. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यात बधाई हो, राझी, अंधाधुन, संजू, पद्मावत या चित्रपटांना सगळ्यात जास्त नामांकनं मिळाली आहेत. या पुरस्कार सोहळ्यात कोण विजेता ठरेल हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे.
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे हे 64 वं वर्षं असून या पुरस्कार सोहळ्यात अनेक बॉलिवूडमधील कलाकार आपले दमदार परफॉर्मन्स सादर करणार आहेत. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील परफॉर्मन्स चांगला असावा यासाठी अनेक कलाकार सध्या मेहनत करत आहेत. आपल्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून ते कित्येक तास तालमी करत आहेत.
तालमी दरम्यानचा रणवीर सिंगचा एक बुमरँग व्हिडिओ नुकताच फिल्मफेअरने त्यांच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्याच्यासोबत आपल्याला मॉनी रॉय दिसत आहे. तालमीच्या दरम्यान मजा मस्ती करताना त्यांनी हा व्हिडिओ काढला आहे. या व्हिडिओत ते दोघे नागिन डान्स करताना दिसत आहेत. मॉनी रॉयला नागिन या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील तिची नागिनची भूमिका प्रचंड प्रसिद्ध झाली होती. त्याचमुळे हे दोघे नागिन डान्स करताना दिसत असल्याचे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सचे म्हणणे आहे.
रणवीर सिंगने देखील त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्याच्यासोबत डान्स करणाऱ्या ग्रुपचा फोटो त्याने पोस्ट केला आहे. या डान्स ग्रुपमधील मंडळी ही शामक दावर या प्रसिद्ध कोरिओग्राफरच्या ग्रुपमधील आहेत.
फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 2019 चे सूत्रसंचालन बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान करणार असून त्याला विकी कौशल, जान्हवी कपूर, राजकुमार राव यांसारखे नव्या पिढीतील कलाकार साथ देणार आहेत. लोकांना खळखळून हसवण्यासोबतच ही नवी पिढी त्यांचे परफॉर्मन्स देखील सादर करणार आहे.