अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती यांच्या छातीत दुखत होतं आणि त्यांना अस्वस्थ वाटत होतं. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ते लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
मिथुन चक्रवर्ती 73 वर्षांचे आहेत. आज सकाळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. थोडी अस्वस्थताही जाणवत होती. त्यांची तब्येत आणखी बिघडण्यापूर्वी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र आता त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला आणि हा पुरस्कार मिळाल्याने खूप खूश असल्याचं देखील सांगितलं. मी सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. मी कधीच कोणाकडे माझ्यासाठी काहीही मागितलं नाही. न मागता काहीतरी मिळालं याचा खूप आनंद वाटत आहे. ही एक अद्भुत आणि वेगळीच भावना आहे. मला खूप चांगलं वाटत आहे असंही म्हटलं आहे.