Join us

मी आनंदी नाही, ३० वर्षीय मॉडेलनं स्वत:ला संपवलं; सुसाईड नोटमध्ये मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 11:02 AM

हॉटेलच्या वेटरने मॉडेलच्या रुमची घंटी वाजवली. त्याने अनेकदा आवाज देऊनही आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

मुंबई - मायानगरी मुंबईत अनेकांनी स्वप्नं पूर्ण होतात तर अनेकांच्या हाती निराशा येते. चंदेरी दुनियात हसणाऱ्या चेहऱ्यांमागे एक वेदना लपलेली असते. याच वेदनेतून काही स्वत:ची सुटका करून घेतात. मुंबईत एका मॉडेलचा जीव गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी मॉडेलनं लिहिलेल्या सुसाईड नोटमधून तिने आत्महत्येचं कारण स्पष्ट केले आहे. 

मुंबईच्या अंधेरी भागात एका ३० वर्षीय मॉडेलनं हॉटेलच्या खोलीत पंख्याला लटकून स्वत:चा जीव दिला आहे. वर्सोवा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलीस आत्महत्येचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी १ वाजता मॉडेलनं हॉटेलमध्ये चेक इन केले होते. त्यानंतर रात्री तिने जेवणासाठी ऑर्डर दिली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या मॉडेलचं नाव आकांक्षा मोहन असून ती लोखंडवाला येथे यमुनानगर सोसायटीत राहायची. 

हॉटेलच्या वेटरने मॉडेलच्या रुमची घंटी वाजवली. त्याने अनेकदा आवाज देऊनही आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर वेटरने याबाबत वरिष्ठांना कळवलं. हॉटेल मॅनेजरने पोलिसांना कॉल करत माहिती दिली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी पोहचत हॉटेलच्या रुमची चावी घेत दरवाजा उघडला. त्यानंतर आतील दृश्य पाहून पोलिसांसह हॉटेल कर्मचारी हादरले. या मॉडेलने पंख्याला लटकून आत्महत्या केल्याचं प्रथम दर्शनी दिसले. 

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना हॉटेल रुममध्ये एक सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोटमध्ये मॉडेलनं लिहिलं होतं की, मला माफ करा, माझ्या आत्महत्येसाठी कुणाला जबाबदार धरू नका. कुणाला त्रास देऊ नका. मी आनंदी नाही, शांतता हवी. वर्सोवा पोलिसांनी ADR अंतर्गत गुन्हा नोंद करत मॉडेलचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. आयुष्यात सुख नसल्याने मॉडेलने आत्महत्या केल्याचं खरे आहे की या मृत्यूमागे अन्य कुठलं कारण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र ग्लॅमरस जगतात होत असलेल्या या घटनांमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ज्याचं उत्तर सध्या कुणाकडेही नाही. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"