बॉलिवूडच्या इतिहासात आजवर अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले ज्यांच्यामुळे कलाविश्व समृद्ध झालं आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे ए.के.हंगल (A.K Hangal). १९६६ पासून त्यांनी बॉलिवूड गाजवायला सुरुवात केली. ए. के. हंगल यांनी त्याच्या कारकिर्दीत जवळपास २२५ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेविषयी फारसं वेगळं सांगायची गरज नाही. मात्र, प्रसिद्ध, यश उपभोगणाऱ्या या अभिनेत्याला उतरत्या वयात अनेक संकटांचा सामना करावा लागला.
ए. के. हंगल यांनी वयाच्या ५० व्या वर्षात कलाविश्वात पदार्पण केलं. त्यापूर्वी त्यांनी १९२९ ते १९४७ पर्यंत स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभाग घेतला होता. १९४७ ते १९४९ ही दोन वर्ष त्यांनी कराचीमधील तुरुंगात काढली. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली आणि फिल्मी करिअरला सुरुवात केली. १९६६ मध्ये त्यांना 'तिसरी कसम' आणि 'शागिर्द' या चित्रपटांमध्ये झळकण्याची संधी मिळाली.
हंगल यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास २२५ चित्रपटांमध्ये काम केलं. त्यामुळे पैसा, यश, संपत्ती सारं काही एकेकाळी त्यांच्या पायाशी लोळण घेत होतं. मात्र, प्रसिद्ध, यश मिळवूनही उतार वयात त्यांना या कसल्याचाच फायदा झाला नाही. आजारपणात त्यांना एक-एक पैशासाठी वणवण फिरावं लागलं.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, ए. के. हंगल यांच्या आजारपणात त्यांच्यावर उपचार करण्यासाठीही पुरेसे पैसे नव्हते. परिणामी, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी २० लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती, असं हंगल यांच्या मुलाने सांगितलं होतं. तसंच करण जोहर (Karan Johar) व अन्य कलाकारही त्यांच्या मदतीसाठी पुढे आले होते. परंतु, मदतीचा ओघ सुरु असतानाच २६ ऑगस्ट २०१२ मध्ये त्यांचं निधन झालं.