A. R. Rahman Daughter Khatija Rahman Wedding : जागतिक ख्यातीचे संगीतकार व सिंगर ए आर रहमान (A. R. Rahman) यांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. कारणही खास आहे. त्यांची लेक खतीजा हिचा नुकताच ‘निकाह’ पार पडला. रहमान यांनी सोशल मीडियावर लेकीच्या निकाहचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. खतीजा हिने रियासदीन शेख मोहम्मद याच्याशी निकाह केला. रहमान यांनी मुलीचा व जावयाचा फोटो शेअर केला आहे. सोबत दोन्ही मुलं अमीन आणि रहीमाही आहेत. फोटोत एक फोटो फ्रेमही दिसतेय. ती रहमान यांच्या दिवंगत आईची आहे. ‘सर्वशक्तिमान, या जोडप्याला आशीवार्द देवो..., तुमच्या शुभेच्छा व प्रेमासाठी आभार..,’असं त्यांनी लिहिलं आहे.
गतवर्षी खतीजा बुरख्यावरून अचानक चर्चेत आली होती. ‘बुरख्यात माझा जीव गुदमरतो,’ असं ट्विट लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केलं होतं. तस्लिमांच्या या ट्विटवर खतीजाने खरमरीत उत्तर दिलं होतं. ‘मला बुरख्यात पाहून तुम्हाला घुसमटल्यासारखं वाटत असेल तर कृपया तुम्ही शुद्ध हवेत जा, मोकळा श्वास घ्या. दुस-या महिलांना कमी लेखणं हा स्त्रीवादाचा अर्थ नाही,’ असं खतीजाने तस्लिमांना उद्देशून लिहिलं होतं.
ए आर रहमान यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. ‘बुरखा घालणं हा खतीजाचा स्वत:चा निर्णय आहे. तिने हा निर्णय घेण्याआधी आम्हा कुणालाही विचारलं नव्हतं. मला संधी मिळाली तर मलाही बुरखा घालायला आवडेल,’ असं ते म्हणाले होते.ए. आर. रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो यांना एकूण तीन मुलं आहेत. खतीजा, रहीमा आणि ए. आर. अमीन. खतीजाने काही तमिळ चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी रजनीकांत यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या ‘एंथीरन के पुडिया मनिधा’ या गाण्यापासून आपला संगीत क्षेत्रातील प्रवास सुरु केला.