Join us

"एकत्र अल्बम करायचं ठरवलं होतं...", झाकीर हुसेन यांच्या आठवणीत ए. आर. रहमान भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:40 IST

संगीतकार ए आर रहमान खूप भावुक झाले असून त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.

उस्ताद झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांचं परवा रात्री निधन झालं. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत आणि जगभरातच शोककळा पसरली. उत्तम तबलावादक हरपल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली. झाकीर हुसेन यांनी ए आर रहमान, शंकर महादेवन ते मराठमोळे राहुल देशपांडे, महेश काळे यांच्यासाठीही तबला वादन केले आहे. संगीतकार ए आर रहमान खूप भावुक झाले असून त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.

ए आर रहमान यांनी ट्वीट करत लिहिले, "झाकीर भाई सर्वांची प्रेरणा होते, एक महान व्यक्तिमत्व ज्यांनी तबला वादन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवलं. त्यांच्या निधनाने मोठं नुकसान झालं आहे. काही दशकांपूर्वी आम्ही ज्याप्रकारे एकत्र काम केलं तितकं गेल्या काही वर्षात करता आलं नाही याची कायमच खंत राहील. तरी आम्ही एक अल्बम सोबत करण्याचं ठरवलं होतं. तुम्ही कायम स्मरणात राहाल. त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या जगभरातील असंख्य विद्यार्थांना या दु:खातून सावरण्याचं बळ मिळो हीच प्रार्थना."

झाकीर हुसेन यांच्यासारखे दिग्गज तबला वादक शोधूनही सापडता येणारे नव्हते. वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच त्यांच्या कानात लय, सूर पडले होते. तबला वादन त्यांचं आयुष्यच झालं होतं. त्यांचे वडील उस्तार अल्ला रक्खा यांच्याकडूनच त्यांना संगीताची देण मिळाली होती. आईचा विरोध असतानाही त्यांनी संगीतच निवडलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी संगीतावर प्रेम केलं. त्यांची पत्नी एंटोनिया ही कथ्थक डान्सर आहे. पत्नीवरील जीवापाड प्रेमासाठी ते अमेरिकेतच स्थायिक झाले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

टॅग्स :ए. आर. रहमानझाकिर हुसैनसोशल मीडियासंगीत