ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान (A. R. Rahman) यांनी दोन दिवसांपूर्वी पत्नीपासून घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. हे समजल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. दोघांचा २९ वर्षांचा संसार इथेच थांबला. तर दुसरीकडे काही वेळानंतर ए आर रहमान यांची सहकारी गिटारिस्ट मोहिनी डे ने सुद्धा तिच्या घटस्फोटाची पोस्ट केली. यावरुन रहमान आणि मोहिनीचंच तर अफेअर नाही ना अशा चर्चा सुरु झाल्या. या चर्चांवर रहमान यांचा मुलगा अमीनने (A R Amin) पोस्ट करत भाष्य केलं आहे.
ए आर अमीनने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले, "माझे वडील महान आहेत. केवळ त्यांच्या अतुलनीय योगदानामुळेच नाही तर त्यांनी आयुष्यात जोपासलेली मूल्ये, इतक्या वर्षात कमावलेला आदर आणि चाहत्यांचं प्रेम यामुळे ते महान आहेत. त्यांच्याबद्दल जेव्हा अशा खोट्या आणि निराधार अफवा पसरल्या हे निराशाजनक आहे. एखाद्याच्या आयुष्याबद्दल, त्याच्या कामाबद्दल बोलताना सत्य आणि आदराचं महत्व विसरु नका. कृपया या चुकीच्या बातम्या पसरवू नका. आपल्या सर्वांवरच एकप्रकारे त्यांचा प्रभाव आहे त्यामुळे त्यांचा सन्मान राखूया."
ए आर रहमान यांच्या वकिलाने सुद्धा या सर्व अफवा फेटाळून लावल्या होत्या. हे सर्व ऐकून रहमान यांच्या मुलाला प्रचंड दु:ख झालं आणि त्याने ते सोशल मीडियावर व्यक्त केलं. रहमान यांनी मात्र अद्याप यावर काहीही भाष्य केलेलं नाही.