सैराट चित्रपटात परश्याच्या भूमिकेतून एका रात्रीत अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) लोकप्रिय झाला. या चित्रपटानंतर त्याने बऱ्याच प्रोजेक्टमध्ये काम केले. नुकताच त्याचा घर बंदुक बिरयाणी (Ghar Banduk Biryani) चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला हवा तितका प्रतिसाद मिळू शकला नाही. दरम्यान आता आकाशला मोठी लॉटरी लागली आहे. आता तो हिंदी चित्रपटात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा अभिनेता म्हणजे संजय दत्त (Sanjay Dutt).
हो, हे खरंय. आकाश ठोसरसंजय दत्तसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. संजय आणि आकाश 'वंदे मातरम' शीर्षक असलेल्या देशभक्तीपर चित्रपटात काम करणार आहेत. 'फेरारी की सवारी' या हिंदी आणि 'व्हेंटिलेटर' या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर 'वंदे मातरम'चं दिग्दर्शन करणार आहेत. '
वंदे मातरम'चं कथानक पिता आणि पुत्राच्या जोडीभोवती गुंफण्यात आले आहे. यात संजय पित्याच्या, तर आकाश पुत्राच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजते आहे. हा चित्रपट देशासाठी बलिदान देणाऱ्या भारतातील शूरवीरांना श्रद्धांजली असल्याचे सांगितले जात आहे. लवकरच मुंबईत या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे. इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहे.