Join us

‘मेला’ फ्लॉप झाल्यानंतर एकदिवस आमिर पोलीस घेऊन आला...; भाऊ फैजलचा शॉकिंग खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 12:19 PM

फैजलनं केली आमिर खानची पोलखोल, वाचा काय म्हणाला?

ठळक मुद्दे‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. यानंतर विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याचा भाऊ फैजल खान  (Faissal Khan) पुन्हा एकदा चर्चेत आहे. तब्बल 30 वर्षानंतर ‘फॅक्टरी’ या सिनेमाद्वारे त्याचं कमबॅक झालंय.  या चित्रपटाच्या निमित्तानं फैजलनं अनेक चॅनलला, पोर्टलला मुलाखती दिल्यात. अशाच  एका मुलाखतीत फैजल सिनेमावर बोलता बोलता आमिर खानवर आला आणि यादरम्यान त्यानं आमिरबद्दल काही धक्कादायक खुलासे केलेत. ‘मेला’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिरने मला अभिनय सोडून अन्य क्षेत्रात काम करण्याचा सल्ला दिला होता. इतकंच नाही तर आमिर पोलीस घेऊन आला होता आणि त्यानं मला माझ्या मनाविरुद्ध त्याला इस्पितळात दाखल केलं होतं, असं फैजल म्हणाला. त्याच्या या धक्कादायक खुलाशानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

 आमिरनं माझी काय मदत करणार?या मुलाखतीत फैजलनं ‘मेला’ फ्लॉप झाल्यानंतरची घटना सांगितली. तो म्हणाला, ‘ मेला हा सिनेमा फ्लॉप झाला होता आणि मी कामासाठी सगळीकडे फिरत होतो. पण आमिरनं माझी कोणतीही मदत केली नाही. त्यानं मला फोन केला आणि  फैजल तू एक चांगला अभिनेता नाहीस. आता  मेला  पण फ्लॉप झाला. आता काय? आता तुला आयुष्यात दुसरं काही शोधलं पाहिजे, असं मला म्हणाला. त्याला मी अभिनेता म्हणून योग्य वाटत नाही तो माझी काय मदत करणार? एक भाऊ या नात्यानं मी नेहमीच आमिरला पाठींबा दिलाय. मी कधीही त्याच्याबद्दल वाईट विचार केला नाही. त्याच्या यशाबद्दल मला जराही मत्सर वाटत नाही. पण मी माझ्या कुटुंबाला भेटणं बंद केलं. आमच्यात काही मतभेद होते. त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा मी त्यांच्यापासून दूर राहणं पसंत केलं, असं त्यानं सांगितलं.

आमिर पोलीस घेऊन आला...पुढे त्यानं सांगितलं, ‘मेला’ फ्लॉप झाल्यानंतर एकदिवस आमिर माझ्या घरी पोलीस घेऊन आला होता. त्याच्यासोबत काही डॉक्टरही होते. त्यांच्या  हातात दोरी आणि काठ्या होत्या. फैजल तुझी तब्येत चांगली नाही. तुला स्किझोफ्रेनिया झाला आहे. तू प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेतून बघतोस. तू आता माझ्यासोबत नर्सिंग होममध्ये आला नाहीस तर डॉक्टर तुला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करतील आणि घेऊन जातील, असं आमिर मला म्हणाला.  यावर हे सगळं करण्याची गरज नाही. मी त्यांच्यासोबत जातो, असं मी म्हणालं. मला वाटलं ते माझ्या काही चाचण्या करतील आणि सोडून देतील पण त्यांनी मला २० दिवस तिथे ठेवलं. ते सगळं बेकायदेशीर होतं. माझा फोन माझ्याकडून काढून घेतला गेला. मला कैदेत ठेवलं. ते मला पाण्यात औषधं द्यायचे. ते घेतल्यावर मी 20-20 तास झोपू लागलो. यात काहीतरी गडबड आहे, ओव्हरडोस झाला तर माझा जीवही जाईल, असं मला लगेच लक्षात आलं. मी बहिणीला फोन केला आणि मला औषधं द्या, पण किती दिली जात आहेत, यावर लक्ष ठेवा, असं मी तिला बोललो. यानंतर 20 दिवसांनी तू आता थोडा बरा आहेस, असं सांगून त्यांनी मला घरी सोडलं.

‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. यानंतर विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘मदहोश’नंतर फैजलने पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि यानंतर 2000 मध्ये ‘मेला’ या चित्रपटातून वापसी करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात फैजल भाऊ आमिरसोबत दिसला होता. हा चित्रपट फ्लॉप झाला. पण या चित्रपटाने फैजलला खरी ओळख दिली. अर्थात  ही ओळख फैजलला फार काळ टिकवता आली नाही.

टॅग्स :आमिर खानफैजल खान