Join us

लैंगिक शोषणाचा आरोप झालेल्या दिग्दर्शकासोबत मोगुलमध्ये काम करणार आमिर खान, यामुळे बदलला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 19:02 IST

आमिर खान मोगुल या चित्रपटात काम करणार असल्याचे त्याने नुकतेच सांगितले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष कपूर करत असून त्याचे मीटू प्रकरणात नाव आले होते.

ठळक मुद्देकोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत कोणतीही व्यक्ती ही निर्दोषच असते. जोपर्यंत त्यांच्यावर कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीने घरीच बसायचे का? त्यांनी कमावणेच बंद करायचे का? असे अनेक प्रश्न मला पडले होते.

मोगुल या चित्रपटाचा दिगदर्शक सुभाष कपूरचे नाव मीटू प्रकरणात आल्यानंतर आमिर खानने या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता आमिरने या चित्रपटात काम करणार असल्याचे सांगितले आहे.

आमिर खान मोगुल या चित्रपटात काम करणार असल्याचे त्याने हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्याने मुलाखतीत म्हटले आहे की, मी आणि किरण मोगुल या चित्रपटाची निर्मिती करणार असून या चित्रपटात मी अभिनय देखील करणार असे आम्ही ठरवले होते. पण त्याचवेळात मला कळले की, सुभाष कपूर यांच्याविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. पण खरे तर ही गोष्ट पाच-सहा वर्षांपूर्वीची आहे. मला या गोष्टीविषयी कळल्यानंतर मला याचा प्रचंड त्रास झाला होता. किरण आणि मी याविषयी अनेकवेळा चर्चा केली. जवळजवळ एक आठवडा तरी आम्ही द्विधा मनस्थितीत होतो. त्यावेळी या चित्रपटातून बाहेर पडण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. पण सुभाष निर्दोष असतील तर काय याचा देखील आम्ही विचार केला. कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत कोणतीही व्यक्ती ही निर्दोषच असते. जोपर्यंत त्यांच्यावर कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीने घरीच बसायचे का? त्यांनी कमावणेच बंद करायचे का? असे अनेक प्रश्न मला पडले होते. माझ्या एका निर्णयामुळे एका व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. मे महिन्यात सुभाष यांनी मला आणि IFTDA ला एक पत्र लिहिले होते. त्यात कोर्टाच्या निकालाची वाट पाहाण्याविषयी त्यांनी नमूद केले होते. या पत्रानंतर मी चुकीचा असल्याचे मला वाटले आणि कपूर यांच्यासोबत काम केलेल्या अनेक महिलांची मी भेट घेतली. त्यांचे कपूर यांच्याबद्दलचे मत खूपच चांगले होते. पण ते महिलांशी चांगले वागतात, याचा अर्थ असा होत नाही की, ते कोणत्या महिलेसोबत वाईट कृत्य करू शकत नाहीत. पण तरीही सगळ्या गोष्टींचा विचार करून मी IFTDA ला पत्र लिहून कळवले की, मी त्यांच्यासोबत काम करायला तयार आहे.

 

आमिर खानने काही महिन्यांपूर्वी ट्वीट केले होते की, लैंगिक अत्याचार ही गोष्ट चुकीची असून याचे कधीच समर्थन करता येणार नाही. आमिर खान प्रॉडक्शनमध्ये या गोष्टींना किंवा असे करणाऱ्या लोकांना कधीच थारा देण्यात आलेला नाही. दोन आठवड्यापासून या मोहिमेद्वारे अनेक जण पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडत आहेत. या प्रकरणात बॉलिवूडमधील काही मंडळींची नावे घेण्यात आली आहेत. त्यातील एका व्यक्तीसोबत आम्ही काम करायला सुरुवात करणार होतो. आम्ही त्याबाबत चौकशी केली असता आम्हाला कळले की, त्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा निर्णय देण्याचा अधिकार नाहीये. त्यामुळे मी माझ्या आगामी प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचे ठरवले आहे.

 

मोगुल हा चित्रपट गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेला असून यात आमिर खान गुलशन कुमार यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

टॅग्स :आमिर खानगुलशन कुमार