बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (aamir khan) सध्या त्याच्या लेकीमुळे चर्चेत येत आहे. आमिरच्या लेकीने आयराने (ira khan) एका मुलाखतीमध्ये आमिरविषयी मोठा खुलासा केला आहे. वडिलांमुळेच मी एकेकाळी नैराश्यात गेले होते असं तिने उघडपणे म्हटलं आहे. सध्या तिची ही मुलाखत चर्चेत येत आहे.
काही दिवसांपूर्वीच आयराने नुपूर शिखरे या मराठमोळ्या तरुणासोबत साखरपुडा केला. त्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली होती. त्यानंतर तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या कुटुंबाविषयी भाष्य केलं आहे. यात खासकरुन तिने तिच्या डिप्रेशनविषयीदेखील सांगितलं.
जवळपास ५ वर्ष नैराश्याशी लढा दिल्यानंतर त्यातून बाहेर पडलेल्या आयराने ऑगस्टू फाऊंडेशन सुरु केलं आहे. या संस्थेसाठी तिला आमिर आणि रिना दत्ता या दोघांनी निधी मिळवून देण्यासाठी मोठी मदत केली. परंतु, आपण नैराश्यात जाण्यामागे आमिर आणि त्याचं कुटुंब जबाबदार असल्याचं तिने म्हटलं.
"मी नेदरलँडला शिकत होते त्यावेळी मी अचानक भारतामध्ये परत येण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आईने मला खूप धीर दिला होता. मी त्यावेळी डिप्रेशनमध्ये होते. मला सतत वाटायचं की जगू नये. म्हणून मी जास्तीत जास्त वेळ झोपायचे. माझ्या आई-वडिलांच्या घटस्फोटाचा माझ्यावर फारसा परिणाम झाला नव्हता. पण, मी डिप्रेशनमध्ये का जातीये हे मला समजत नव्हतं," असं आयरा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मी माझ्या अवस्थेविषयी कोणाला सांगितलं नव्हतं कारण, मला इतरांच्या काळजीत भर घालायची नव्हती. हा प्रकार दीड वर्ष सुरु होता. मी ४-४ दिवस जेवायचे नाही. मी प्रत्येक ८-१० महिन्यांनी नैराश्यात जायचे. हे नेमकं कशामुळे होतंय मला समजत नव्हतं. पण, काही काळाने मला समजलं की हा आजार माझ्या कुटुंबातच आहे. माझ्या कुटुंबातून मला मानसिक आजार मिळालेला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये मी अशीच डिप्रेशनमध्ये गेले होते. औषधं घेणं बंद केलं होतं त्यामुळे वजन वाढलं होतं. मात्र, खूप मेहनत करुन मी मानसिक स्थैय मिळवलं."