बॉलिवूड अभिनेता आमिर खान (aamir khan) त्याच्या प्रत्येक सिनेमाची आणि भूमिकेची अत्यंत चोखंदळपणे निवड करत असतो. त्यामुळेच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं. आजवरच्या कारकिर्दीत आमिरने लगान, राजा हिंदुस्तानी, दंगल यांसारखे अनेत सुपरहिट सिनेमाबॉलिवूडला दिले आहेत. मात्र, त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. त्याला बराच स्ट्रगल करावा लागला. एका मुलाखतीमध्ये आमिरने त्याच्या संघर्ष काळावर भाष्य केलं आहे. एक काळ असा होता ज्यावेळी देणेकरी त्यांच्या दारात उभे होते, असंही त्याने या मुलाखतीमध्ये सांगितलं.
अलिकडेच आमिरने 'ह्युमन ऑफ बॉम्बे'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीवर भाष्य केलं. आज आमिर श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत गणला जातो. मात्र, एक काळ असा होता जेव्हा त्याला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत होतं.
"माझे वडील चित्रपट निर्माते ताहीर हुसैन यांनी अनेक सिनेमा केले. पण, काही सिनेमा रखडल्यामुळे ते प्रचंड कर्जबाजारी झाले होते. त्यांचे काही सिनेमा यशस्वी झाले तर काही चित्रपटांमध्ये पैसा अडकला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे पैसा कधीच टिकला नाही. ज्या लोकांकडून त्यांनी कर्ज घेतले त्यांचे फोन यायचे आणि भांडण सुरू व्हायची. ते म्हणायचे, मी काय करू, माझे चित्रपट अडकले आहेत. अभिनेते तारखा देत नाहीत, पैसे कसे परत करु", असं म्हणत आमिरने वडिलांची आठवण सांगितली.
या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या मिस्टर परफेक्शनिस्ट असल्याच्या टॅगवरही प्रतिक्रिया दिली. लोकांना असं वाटतं की मी खूप विचारपूर्वक निर्णय घेतो पण, तो पूर्णपणे मुर्खपणा आहे. मी आता विचार करणं सोडून दिलंय आणि मनापासून निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, अलिकडेच आमिरच्या लेकीचं आयरा खानचं नुपूर शिखरेसोबत लग्न झालं. या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. सध्या तरी आमिरने अभिनयातून ब्रेक घेतला असून तो चॅम्पियन या सिनेमाची निर्मिती करणार आहे.