Join us  

पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी वर्ध्यात पोहचला अभिनेता आमीर खान, सेवाग्राम आश्रमाला दिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 5:02 PM

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाउंडेशन प्रयत्न करत आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खानने आपल्या 'पानी फाउंडेशन'च्या माध्यमातून पाण्याच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यास हातभार लावला आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाउंडेशन प्रयत्न करत आहे. नुकतेच 'पानी फाउंडेशन'च्या कामानिमित्त आमिर खान वर्धा येथे पोहचला. यावेळी त्याने सेवाग्राम आश्रमालाही भेट दिली. 

 वर्धा येथील महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात रविवारी आमिर खान पोहचला. अभिनेत्याने सुरुवातीला शहरातील पाणी फाउंडेशनचा कार्यक्रमाला हजेरी लावली. वर्धा येथील आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय येथे पानी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धा २०२४ आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने पानी फाउंडेशनचा संस्थापक आमिर खान वर्ध्यातील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना शेती करतांना येणाऱ्या अडचणी आणि त्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान याबद्दल सविस्तर चर्चा आणि माहिती देण्यात आली.  हा कार्यक्रम संपल्यानंतर आमिर खान हा आश्रमात पोहचला. 

आमिर खानला आश्रमाकडून कातलेल्या सुताची माळ आणि चरखा भेट स्वरुपात देण्यात आला. माध्यमांशी बोलताना आमिर खान म्हणाला,  प्रथमच महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात आलो आहे. इथे आल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. इथे प्रवेश करताच वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळाली.  गांधीजींच्या विचारांचा माझ्यावर मोठा प्रभाव राहिला आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की, ज्या ठिकाणी  बापूजी दीर्घकाळ राहिले, ज्या गोष्टी त्यांनी वापरल्या, त्या पाहून वेगळीच अनुभूती आली, मी शब्दात व्यक्त करू शकत नाही', असं तो म्हणाला. 

आमिर खान, किरण राव आणि संपूर्ण पानी फाउंडेशनची टीम मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि आसपास जल संरक्षण गतिविधिच्या कार्याशी सलग्न आहे. फाउंडेशनच्या अविश्वसनीय कार्याने, वेळ आणि प्रयत्नाने मनुष्य, वृक्ष आणि पशुपक्ष्यांना सामंजस्यपूर्ण रुपात  सक्षम बनवले असून त्यांच्या प्रयत्नाने पडीक, दुष्काळी जमिनीवर आज हरित जंगले उभी राहताना दिसत आहेत. आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो आगामी 'सितारे जमीन पर' मध्ये दिसणार आहे. 'लाल सिंग चड्डा' फ्लॉप झाल्यानंतर आता तो या सिनेमात काम करत आहे. 'तारे जमीन पर' मधला ईशान म्हणजेच दर्शिल सफारीही पुन्हा आमिरसोबत दिसणार आहे. 

टॅग्स :आमिर खानसेलिब्रिटीबॉलिवूडमहात्मा गांधी