बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने (Aamir Khan) नुकतीच दुस-या पत्नीपासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. साहजिकच या घटस्फोटाची जोरदार चर्चा झाली. पण तूर्तास आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या सिनेमाची चर्चा आहे. सध्या लडाखमध्ये या सिनेमाचे शूटींग सुरू आहे. पण हे शूटींग सुरू असताना लडाखमधील स्थानिक नागरिक मात्र संतापले आहेत. कारण काय तर कचरा. होय, ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमाची टीम लडाखमध्ये प्रदूषण पसरवत असल्याचा आरोप केला आहे. केवळ आरोप नाही तर पुराव्यादाखल या ग्रामस्थांनी याचा व्हिडीओही शेअर केला आहे. व्हिडीओ लडाखमधील वाखा गावचा आहे. गावात सर्वत्र कचरा पसरलेला दिसतो. प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचरा सर्वत्र विखुरलेला दिसतोय.एका युजरने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तूर्तास हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
‘अभिनेता आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या सिनेमाची टीम गावाला ही भेट देऊन निघून गेली आहे. आमिर खान त्याच्या सत्यमेव जयते या शोमध्ये प्रदूषणाबद्दल मोठ मोठ्या बाता मारतो. मात्र स्वत:वर वेळ आली की हे असं असतं,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना संबंधित युजरने लिहिले आहे.काही दिवसांपूर्वी ‘लाल सिंग चड्ढा’च्या सेटवरचा एक फोटो अभिनेता नागा चैतन्यने शेअर केला होता. यात आमिर व किरण राव दिसले होते. घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदा किरण व आमिर सोबत दिसले होते.
‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात आमिर आणि करीना कपूर खान एकत्र दिसणार आहेत. ही जोडी यापूवी ‘3 इडियट्स’मध्ये एकत्र दिसली होती. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट टॉम हॅक्सचा ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड सिनेमावर बेतलेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहे.