‘सुपरस्टार’च्या प्रश्नावरून आमिर खानने सलमान-शाहरूखविषयी केले धक्कादायक वक्तव्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 11:51 AM
बॉलिवूडचा किंग कोण? असा जेव्हा प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा आमिर, शाहरूख आणि सलमान या तीन खानचा उल्लेख केला ...
बॉलिवूडचा किंग कोण? असा जेव्हा प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा आमिर, शाहरूख आणि सलमान या तीन खानचा उल्लेख केला जातो. कारण सध्यातरी या तिन्ही खानचेच बॉलिवूडवर वर्चस्व आहे, हे तेवढेच खरे आहे. याच अनुषंगाने जेव्हा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याला विचारण्यात आले तेव्हा त्याने मी स्वत:ला सुपरस्टार मानत नसल्याचे म्हटले. आमिर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने, मी शाहरूख आणि सलमानचा फॅन असल्याचे सांगितले. आमिरने दिलेले हे उत्तर मनापासून होते की उपरोधिक हे मात्र कोडेच म्हणावे लागेल. आमिरच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी आमिरला याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. खरं तर आमिरला हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे, सलमानचा ‘ट्यूबलाइट’ बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकला नाही. त्याचबरोबर शाहरूखलाही गेल्या काळापासून अपयशाचा सामना करावा लागत आहे. मात्र या दोघांच्या तुलनेत आमिरचा विचार केल्यास, तो सातत्याने यशस्वी होत आहे. आमिरच्या ‘दंगल’ने तर बॉक्स आॅफिसवर कमाईचे अनेक उच्चांक गाठले, अशात तोच बॉलिवूडचा यशस्वी सुपरस्टार असेल अशा उत्तराची त्याच्याकडून अपेक्षा होती. परंतु त्याने दिलेले उत्तर अनेकांना बुचकळ्यात टाकणारे ठरले. आमिरने पुढे बोलताना म्हटले की, खरं तर असा विचार करणेच मुळात चुकीचे आहे. कारण अशाप्रकारची तुलना केली जाऊ नये, असे मला वाटते. चित्रपट पूर्णत: क्रिएटिव्ह कामावर आधारित असतो. त्यामुळे तुम्ही लगेचच असा निष्कर्ष काढू शकत नाही की, चित्रपट यशस्वी होईलच. आमिर म्हणतो की, मी असा विचार करीत नाही की, कोणाच्याही एक किंवा दोन चित्रपटांमुळे त्यांच्या स्टारडमला धक्का लागू शकतो. सलमान आणि शाहरूख दोघेही इंडस्ट्रीमधील मोठे सुपरस्टार आहेत. त्यामुळे अशा प्रकारची तुलना करणे बरोबर नाही. खरं तर मी सलमान आणि शाहरूखचा फॅन असल्याचेही आमिरने सांगितले. यावेळी आमिरला, तिन्ही सुपरस्टार्सचे चित्रपट सणासुदीच्या काळातच का रिलीज करतात? अशात तुझ्या चित्रपटाच्या रिलिजसाठी कोणती तारीख योग्य असेल? असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा त्याने माझ्या चित्रपटातील कुठलीही तारीख ठरविली तरी मला त्याविषयी फारसा फरक पडत नाही. खरं तर मी कधीच रिलीजसाठी हीच तारीख असावी, असा हट्ट धरलेला नाही. जेव्हा आम्ही एखादा चित्रपट बनवितो तेव्हा तो चांगल्या वेळेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा हीच माझी अपेक्षा असते. कारण योग्य वेळेत चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचविल्यास त्याचा त्यांना आनंद घेता येतो. सुपरस्टार सलमान खानचा चित्रपट ईदला, शाहरूखचा दिवाळीला तर आमिरचा चित्रपट ख्रिसमसला रिलीज केला जात असतो.