उत्तम अभिनयामुळे कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारे दोन दिग्गज कलाकार म्हणजे आमिर खान (aamir khan) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit). जवळपास ९०च्या दशकापासून हे दोन्ही कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी दररोज अनेक चर्चा रंगत असतात. या जोडीने 'दिल' या गाजलेल्या सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही तुफान गाजला होता. परंतु, या दोघांचा हा पहिला सिनेमा नसून यापूर्वी त्यांनी आणखी एका सिनेमात काम केलं होतं. मात्र, तो सिनेमा आजतागायत रिलीज झाला नाही.
'दिल' हा आमिर-माधुरीचा पहिला सिनेमा असल्याचं म्हटलं जातं. परंतु, यापूर्वी या जोडीने दीवाना मुझसा नहीं या सिनेमात काम केलं होतं. मात्र, सिनेमाचं संपूर्ण चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतरही तो रिलीज झाला नाही. 'कयामत से कयामत तक' या सिनेमातील आमिरचा अभिनय पाहिल्यानंतर नागेश्वर राव यांनी त्याला दीवाना मुझसा नहीं या सिनेमासाठी साईन केलं होतं. या सिनेमात त्याच्यासोबत माधुरी दीक्षितला कास्ट करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे १९८९ मध्ये या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं. मात्र, ऐनवेळी सिनेमाच्या मेकर्सने हा सिनेमा रिलीज न करण्याचा निर्णय घेतला.
'या' कारणामुळे रिलीज झाला नाही सिनेमा
'दीवाना मुझसा नहीं' या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर मेकर्सने डिस्ट्रीब्युटर्ससाठी या सिनेमाचं स्क्रिनिंग ठेवलं. परंतु, आमिर आणि माधुरी यांची जोडी पडद्यावर शोभून दिसत नसल्याचं म्हणत डिस्ट्रीब्युटर्सने या सिनेमाचे हक्क खरेदी करण्यास नकार दिला. दरम्यान, प्रेक्षकांना सध्या आमिर आणि जुही चावला ही जोडी आवडत आहे. त्यामुळे आमिरसोबत अन्य कुठल्या अभिनेत्रीला पाहणं चाहत्यांना आवडणार नाही. तसंच या सिनेमात आमिरपेक्षा माधुरीच्या भूमिकेला जास्त महत्त्व देण्यात आलं आहे, असं कारण देत डिस्ट्रीब्युटर्सने हा सिनेमा नाकारला.