एक काळ असा होता की आमीर खानचा प्रत्येक वर्षी एक सिनेमा रिलीज व्हायचा. आणि हा सिनेमा वर्षभराची बॉक्स ऑफीस कमाई करुन जायचा. मग ते '3 इडियट्स' असो, 'दंगल' असो, वा 'पीके'.. आमिर खानचा सिनेमा म्हणजे सुपरहिटची गॅरंटी हे समीकरण ठरलेलं. आमिर खानने आजवर त्याच्या करिअरमध्ये विविध भूमिका साकारल्या. अशातच आमिरला क्रांतीकारक भगत सिंग यांच्या भूमिकेची ऑफर आलेली. पण ही भूमिका करायला आमिरने नकार दिला. काय होतं कारण?
आमिर नुकतंच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी आमिरने भगत सिंग यांची भूमिका करायला का नकार दिला, याचा खुलासा केला. आमिर म्हणाला की, "स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग एक अद्वितीय आणि दुर्मिळ व्यक्ती होते. 20 व्या वर्षी त्यांनी आयुष्यात जे काही साध्य केले ते कल्पनेच्या पलीकडे आहे. भगतसिंग पूर्णपणे निर्भय होते आणि हा एक अत्यंत दुर्मिळ गुण आहे. एक 23 वर्षांचा माणूस ज्याला नुकतीच मिशी येतेय. तो कोर्टात उभा राहून मोठं विधान करतोय."
आमिर पुढे म्हणतो की, "मी त्यावेळी ३५ - ४० च्या घरात होते. मला वाटले की या व्यक्तिरेखेच्या भूमिकेत मी प्रभाव पाडू शकणार नाही. माझं वय आणि भगत सिंग यांचं वय पाहता मी कोर्टात उभं राहून सर्वांना ठणकावणं बरोबर वाटणार नाही. मी राजकुमार संतोषीला वीस वर्षांच्या तरुण मुलाला कास्ट करायला सांगितलं. जो भगतसिंग म्हणून शोभून दिसेल. त्यामुळे या भूमिकेचा मान ठेऊन मी ही भूमिका नाही केली." पुढे या सिनेमात अजय देवगणने भगत सिंग यांची भूमिका साकारली.