‘द काश्मिर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची सध्या देशभर चर्चा आहे. सर्वस्तरातून या चित्रपटाचं कौतुक होत आहे. बॉलिवूडच्या दिग्गजांनी मात्र या चित्रपटांवर मौन बाळगलं आहे. अनेक बॉलिवूडकरांना यामुळे ट्रोलही केलं जात आहे. अशात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan)पहिल्यांदा या चित्रपटाबद्दल बोलला आहे. ‘द काश्मिर फाईल्स’ हा सिनेमा प्रत्येक भारतीयाने पाहायला हवा, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
एस.एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटाच्या दिल्लीतील एका प्रमोशन इव्हेंटमध्ये आमिर ‘द काश्मिर फाईल्स’वर बोलला.
‘मी अद्याप ‘द काश्मिर फाईल्स’ हा सिनेमा पाहिलेला नाही. पण मी लवकरच तो पाहणार आहे. या चित्रपटातील घटना आपल्या देशाच्या इतिहासातील एक अशी घटना आहे ज्यामुळे अनेकांनी खूप काही सोसलं. काश्मिरी पंडितांनी जे भोगलं ते दु:खद आहे. या घटनेवर बनलेला ‘द काश्मिर फाईल्स’ हा सिनेमा प्रत्येक भारतीयाने बघायला हवा. जेव्हा एका व्यक्तीवर अत्याचार होतो, तेव्हा तो कशा वेदना देतो, हे प्रत्येक भारतीयाने बघायला हवं. माणूसकीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या भावनांना या चित्रपटाने स्पर्श केला आहे आणि हेच या चित्रपटाचं सौंदर्य आहे. मला आनंद आहे की चित्रपटाला एवढं यश मिळतंय, कौतुक होतंय. चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. मी हा चित्रपट नक्कीच पाहणार आहे,’असं आमिर म्हणाला.
विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात पल्लवी जोशी, अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.