आमिर खानचा (Aamir Khan ) ‘लाल सिंग चड्ढा’ ( Laal Singh Chaddha) हा बहुप्रतिक्षीत सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. येत्या 11 तारखेला हा सिनेमा रिलीज होतोय. पण त्याआधी सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. आमिरवर एक ना अनेक आरोप होत आहेत. यातलाच एक आरोप म्हणजे, चेहऱ्यावरचे तेच ते भाव, तिच ती अॅक्टिंग. ‘लाल सिंग चड्ढा’चा ट्रेलर आला आणि चाहते नाराज झालेत.
होय, ‘लाल सिंग चड्ढा’ असो, ‘पीके’ असो, ‘धूम 3’ असो किंवा मग ‘थ्री इडियट्स’ प्रत्येक सिनेमात आमिर एकसारखा अभिनय करत असल्याचं युजर्सचं मत आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ आणि त्याच्या आधीच्या अनेक चित्रपटातील सीन्सची तुलना नेटकऱ्यांनी केली आहे. दोन्हींमध्ये आमिरच्या चेहऱ्यावर तेच हसू, तेच भाव असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. आता आमिरने या टीकेला उत्तर दिलं आहे.‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर यावर बोलला.
काय म्हणाला आमिर...माझ्या मते, लोकांनी आधी सिनेमा पाहावा आणि मग याबद्दल बोलावं. लोकांना माझे एक्सप्रेशन सारखे वाटत आहेत, यामागे कारण आहे. लाल सिंगची भूमिका असो वा पीकेमधला समर, या कॅरेक्टरध्ये एकसारखा निष्पाप भाव आहे. त्यामुळे कदाचित ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला एखादा सीन सारखा वाटू शकतो. पण ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला त्यातलं वेगळेपण ठळकपणे दिसेल. तेव्हा अरे, हे तर एक वेगळं कॅरेक्टर आहे, हे प्रेक्षकांना कळेल. तो तुम्हाला पीके नाही तर लाल सिंग दिसेल, असं आमिर म्हणाला.आमिरचा ‘पीके’ हा सिनेमा 2014 साली रिलीज झाला होता. यात आमिरने एका एलियनची भूमिका साकारली होती. ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात आमिरसोबत करिना कपूर लीड रोलमध्ये आहे. हा सिनेमा ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूडपटाचा रिमेक आहे. यात मोना सिंगने आमिरच्या आईची भूमिका साकारली आहे तर नागा चैतन्य त्याच्या मित्राच्या भूमिकेत आहे.