Join us

फी न घेता चित्रपटाच्या नफ्यातील ८० टक्के वाटा का घेतो आमिर खान?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 8:26 AM

आमिर खान चित्रपटासाठी मानधन घेत नाही तर चित्रपटाच्या नफ्यातील ८० टक्के वाटा घेतो. पण असे का? यामागे आमिरचे कुठले आर्थिक गणितं असावे? कुठला व्यावसायिक दृष्टिकोण असावा?

आमिर खान चित्रपटासाठी मानधन घेत नाही तर चित्रपटाच्या नफ्यातील ८० टक्के वाटा घेतो. पण असे का? यामागे आमिरचे कुठले आर्थिक गणितं असावे? कुठला व्यावसायिक दृष्टिकोण असावा? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर या प्रश्नांचे उत्तर मिळालेय. होय, खुद्द आमिर खानने याचे उत्तर दिले आहे.पाचव्या स्क्रिनराईटर्स कॉन्फरन्समध्ये तो यावर बोलला. मला खूप सारा नफा मिळतो, असे लोकांना वाटते. पण असे अजिबात नाही. मला कमाईचा लाभ सर्वांत शेवटी मिळतो, असे सांगत त्याने चित्रपटाच्या कमाईतून होणाऱ्या नफ्याचे गणित तपशीलवार लोकांना समजावून सांगितले. त्याने सांगितले की, समजा एक चित्रपट १०० कोटी रूपयात बनला तर यासाठी झटणारा राइटर्स, टेक्निशिअन्स, अ‍ॅक्टर्स अशा प्रत्येक व्यक्तिला त्याची फी या १०० कोटी रूपयांतून दिली जाते. त्यांना त्यांचे पैसे सुरुवातीलाच मिळतात. पण माझा पैसा मला सुरुवातीला नाही तर सगळ्यात शेवटी मिळतो. कारण मी त्या चित्रपटाचा प्रॉफिट पार्टनर असतो. समजा चित्रपटाच्या जाहिरातींवर २५ कोटी खर्च झालेत तर सर्वप्रथम या २५ कोटींची वसूली केली जाते. म्हणजे त्या चित्रपटाने १२५ कोटी रूपये कमावल्यानंतरच यावरची जी कमाई होईल, त्यातील ८० टक्के रक्कम मला मिळते. याचमुळे चित्रपटाचे निर्माते माझ्यासोबत काम करण्यास घाबरतात. त्यांना माझी फी देणे जड जाते. खरे तर मला माझा पैसा सर्वांत शेवटी मिळतो. शिवाय यात मोठी जोखिमही आहे. चित्रपट नाहीचं चालला तर सर्वाधिक माझे नुकसान होते, असे आमिरने सांगितले. यामुळे माझ्यासाठी चित्रपटाची कथा सर्वाधिक महत्त्वाची असते. चित्रपट साईन करण्यापूर्वी त्याच्या कथेबद्दल नाही तर त्यात कोणते कपडे घालणार, याचा विचार करणारे महाभागही बॉलिवूडमध्ये आहेत. पण माझ्यासाठी कथा सर्वाधिक महत्त्वाची आहे. ती आवडली तरचं मी चित्रपट साईन करतो. यानंतर चित्रपटाच्या निर्मात्याचे पैसे वाया जाणार नाहीत, यासाठी झटतो. आजपर्यंत मी ज्या कुण्या निर्मात्यांसोबत काम केले, त्यांच्या पैशांचा चुराडा होऊ दिलेला नाही, असेही त्याने सांगितले.आमिरचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. यात आमिरसह अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

टॅग्स :आमिर खान