Join us

"महाराष्ट्र बंद नसता तर मी कधीच अभिनेता झालो नसतो!", आमिर खानचा भन्नाट खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 10:44 AM

आमिर खान आज ज्या स्टारपदावर आहे त्या पदावर पोहोचण्यासाठी महाराष्ट्र बंदचा किती वाटा आहे, वाचा हा खास किस्सा (aamir khan, maharashtra)

आमिर खान हा बॉलिवूडमधील परफेक्शनिस्ट अभिनेता म्हणून ओळखला जातो. आमिरला आपण आजवर विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. आमिर नुकतंच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी आमिरने 'महाराष्ट्र बंद'चा त्याच्या अभिनय कारकीर्दीत किती महत्वाचा वाटा आहे, याचा खुलासा केला. आमिरचे वडिल नासीर साब यांना अजिबात वाटत नव्हतं की त्यांच्या मुलांनी अभिनय क्षेत्रात यावं. कारण हे क्षेत्र स्थिर नाही, इथे कधीही काहीही होऊ शकतं, याची त्यांना जाणीव होती. 

आमिरला मात्र मनोरंजन क्षेत्र खुणावत होतं. पण वडिलांसमोर बोलायची हिंमत नव्हती. अशातच आमिरने पाहिलं की त्याच्या कॉलेजमध्ये एका गुजराती नाटकाचं ऑडिशन होतं. आमिरची त्या नाटकात निवड झाली. रिहर्सल जोरात सुरु झाल्या. आणि एके दिवशी महाराष्ट्र बंदमुळे आमिरला नाटकाच्या रिहर्सलला जाता आलं नाही. दुसऱ्या दिवशी आमिरने नाटकाच्या दिग्दर्शकांना कारण सांगितलं. नाटकातले बाकीचे कलाकार मात्र महाराष्ट्र बंद होऊनही आले होते. त्यामुळे दिग्दर्शकांनी आमिरला तडकाफडकी नाटकातून काढून टाकलं.

नाटकाच्या प्रयोगाला दोन दिवस होत बाकी असताना आमिरच्या हातून नाटक गेलं. आमिरला खूप वाईट वाटलं. त्याच्या डोळ्यांतून पाणी आलं. आणि याच वेळी त्याच्या काही मित्रांनी त्याला शॉर्टफिल्ममध्ये काम करण्याची संधी दिली. त्याचे हे मित्र पुण्यात  FTII मध्ये डिप्लोमा करत होते. आमिरने दोन शॉर्टफिल्ममध्ये काम केलं. आणि हे काम बघून केतन मेहतांनी आमिरला त्याच्या पहिल्यावहिल्या 'होली' सिनेमाची ऑफर दिली. पुढे नासिर साब यांनाही मुलाबद्दल विश्वास वाटला. त्यांनी त्याला 'कयामत से कयामत तक' सिनेमात प्रमुख भूमिका दिली. आणि आज आमिर हा स्टार कलाकार आहे. अशाप्रकारे जर त्यावेळी 'महाराष्ट्र बंद' नसता तर आमिर कदाचित आज ज्या स्टारपदावर आहे तिथे पोहोचू शकला नसता.

टॅग्स :आमिर खानपुणे