Join us

'महाभारत'वर आधारित सिनेमा आहे आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट; म्हणाला, "मला भीती वाटते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 10:59 IST

बॉलिवूडचा 'परफेक्शनिस्ट' अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खान असं का म्हणाला?

बॉलिवूडचा 'परफेक्शनिस्ट' अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खान (Aamir Khan) काही काळापासून पडद्यावरुन गायब आहे. 'लाल सिंह चड्डा' फ्लॉप झाल्यानंतर त्याला चांगलाच धक्का बसला. तर EX पत्नी किरण रावने दिग्दर्शित केलेला आणि त्याने निर्मित केलेला 'लापता लेडीज'ला खूप यश मिळालं. सिनेमा भारताकडून ऑस्करसाठीही पाठवला गेला आहे. आमिर खानने नुकतंच त्याचा ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत' बाबत अपडेट दिलं.

आमिर  खानने बीबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले. पुढील वर्षी त्याचं ध्येय काय असणार आहे? यावर तो म्हणाला, "मला खरंच बरेच चित्रपट बनवायचे आहेत आणि नवीन टॅलेंटला संधी द्यायची आहे. मी स्वत: अभिनयही सुरु ठेवेन. साधारणपणे अभिनेता म्हणून मी २-३ वर्षांतून एक सिनेमा करतो. मात्र पुढील दशकात दरवर्षी एक सिनेमा करण्याची मला आशा आहे. मला आवडणाऱ्या गोष्टींवर आधारित अनेक सिनेमांची निर्मितीही मला करायची आहे."

आमिर खानने यावेळी 'महाभारत' सिनेमावरही भाष्य केलं. तो म्हणाला, "तो माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे पण खूप भयावह आहे. हा खूपच मोठा प्रोजेक्ट आहे आणि मी यात काही चुका करेन अशी मला भीती वाटते. ही खूप मोठी जबाबदारी आहे कारण प्रत्येक भारतीयाच्या अतिशय जवळची ही कथा आहे. म्हणूनच मला हे अगदी योग्य पद्धतीने करायचं आहे. ते पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी माझी इच्छा आहे. भारताजवळ काय आहे हे मला जगाला दाखवायचं आहे. हे घडेल की नाही मला माहित नाही, पण हा अशा प्रोजेक्ट आहे ज्यावर मला काम करायचंच आहे. बघुया कसं होतंय ते."

आमिर खान लवकरच 'सितारे जमीं पर' सिनेमातून कमबॅक करणार आहे. यामध्ये दर्शिल सफारी, जिनिलिया डिसूजा यांचीही भूमिका आहे. पुढील वर्षी सिनेमा रिलीज होऊ शकतो. 

टॅग्स :आमिर खानबॉलिवूडमहाभारतसिनेमा