अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) पहिली पत्नी रीना दत्ताच्या (Reena Dutta) वडिलांचं निधन झालं आहे. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आमिर त्याची आई झीनत हुसैन यांच्यासोबत रीना दत्ता यांच्या घरी पोहोचला. रीना यांच्या या दु:खद प्रसंगी आमिर सोबत उभा आहे. आमिर आणि त्याच्या आईचा रीना दत्ता यांच्या घराबाहेर पडतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
रीना दत्ता यांचे वडील एयर इंडियामध्ये सीनिअर ऑफिसर होते. वडिलांच्या निधनामुळे त्या शोकसागरात बुडाल्या आहेत. आमिर खानसोबत त्याच्या आईनेही रीना यांची भेट घेतली. ज्या कधीकाळी त्यांच्या सून होत्या. त्यांनी रीना यांचं सांत्वन केलं. व्हिडिओमध्ये आमिरची आई स्वत: किती वयस्कर आहेत आणि त्यांनाही चालायला फिरायला अवघड होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. आधार घेत त्या गाडीतून उतरताना दिसत आहेत.
काही महिन्यांपूर्वी आयरा खानच्या लग्नात आमिरच्या दोन्ही पत्नी दिसल्या होत्या. सर्व कुटुंब एकत्र होतं. आमिरचा भाऊ देखील होता. आमिर खान आणि रीना दत्ता १९८६ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना आयरा आणि जुनैद ही मुलं झाली. लग्नाच्या १६ वर्षांनी त २००२ साली त्यांनी घटस्फोट घेतला. नंतर आमिर खानने २००५ साली दिग्दर्शिका किरण रावशी लग्न केले. मात्र त्यांचाही संसार १५ वर्ष टिकला आणि २०२१ मध्ये ते वेगळे झाले. त्यांना सरोगसीद्वारे आझाद हा मुलगा आहे.