Join us

फिटनेसचं असंही वेड! आठ किलोमीटर रनिंग करत लग्नासाठी पोहोचला; आमिरने केलं जावयाचं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 9:11 AM

या हटके लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे

गेल्या काही दिवसांपासून आमिर खानची (Amir Khan) लेक आयरा खानच्या (Ira Khan)  लग्नाची चर्चा होती. अखेर आयरा आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare) का लग्नबंधनात अडकले. मुंबईतील हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये दोघांचं रजिस्टर मॅरेज पार पडलं. यावेळी नवरा मुलगा नुपूर शिखरे चक्क जिमच्या वेशात रनिंग करत आला होता. आमिर खानने जावयाचं स्वागत केलं. नेटकऱ्यांना मात्र हे काही फार रुचलं नाही. त्यांनी नुपूरला जोरदार ट्रोल केले आहे.

नुपूर शिखरे जिम आणि फिटनेस ट्रेनर आहे. आमिर खानच्या लेकीशी लग्न करण्यासाठी तो चक्क मित्रांसोबत जॉगिंग करत आला होता. १-२ किलोमीटर नव्हे तर त्याने ८ किलोमीटर रनिंग करत तो हॉटेलपर्यंत पोहोचला. संध्याकाळी ६ वाजता दोघांचं रजिस्टर मॅरेज पार पडलं. या हटके वरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. 

नुपूर हॉटेलच्या गेटवर येताच आमिर खानने त्याची गळाभेट घेत स्वागत केलं. यावेळी आमिर खान पांढऱ्या रंगाच्या शेरवानीत दिसला. तसंच त्याने गुलाबी रंगाचा फेटाही बांधला होता. लेकीच्या लग्नात आमिर खानच चांगला तयार झाला होता तर जावई जिमच्या कपड्यात घामाघूम होऊन पोहोचला होता. 

नेटकऱ्यांनी हे बघून आमिर खानच्या कुटुंबाला चांगलंच ट्रोल केलं आहे. कमेंट्समध्ये नुसता सुळसुळाट झाला. बोरिंग लग्न म्हणत अनेकांनी नावं ठेवली आहेत. गेल्या वर्षी नुपूर आणि आयरा खानचा साखरपुडा झाला होता. नुपूर आमिर खानचा जिम ट्रेनर होता. दरम्यान त्याची आमिरच्या लेकीशी ओळख झाली. त्यांच्यात प्रेम फुललं आणि अखेर काल दोघंही लग्नबंधनात अडकले.

टॅग्स :आमिर खानइरा खानलग्नसोशल मीडियाट्रोल