बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान (Amir Khan) आजकाल वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. नुकतंच तो एक्स वाईफ रीना दत्तासोबत दिसला. लवकरच त्याची लेक इरा खान लग्नबंधनात अडकणार आहे. ३ जानेवारी रोजी इरा आणि नुपूर शिखरे उदयपूरमध्ये लग्न करतील अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे आमिरचा मुलगा जुनैद (Junaid Khan) लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. आश्चर्य म्हणजे साऊथची आघाडीची अभिनेत्री साई पल्लवीसोबत (Sai Pallavi) तो स्क्रीन शेअर करणार आहे.
माध्यम रिपोर्ट्सनुसार, आमिर आणि रीना दत्ता यांचा मुलगा जुनैद बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. त्याच्या डेब्यूबाबतीत अनेक प्रकारचे तर्कवितर्क लावले जात होते. रिपोर्ट्सनुसार यशराज बॅनर्सच्या 'महाराजा' फिल्ममधून जुनैद डेब्यू करणार आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने शूट केले. यावेळी आमिर स्वत: सेटवर उपस्थित होता. याशिवाय जुनैद खान 'लव्ह टुडे' या तमिळ सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करणार आहे. यामध्ये त्याची जोडी श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरसोबत झळकणार आहे. इतकंच नाही तर तो वडिलांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेली सीरिज 'प्रीतम प्यारे' मध्येही दिसणार आहे. आता जुनैद आणि साऊथ अभिनेत्री साई पल्लवीच्यासिनेमाचीही जोरदार चर्चा आहे.
जुनैद आणि साईपल्लवीचा हा एक रोमँटिक सिनेमा असेल. यामाध्यमातून साई पल्लवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करु शकते. सिनेमाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. सुनील पांडे यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. मात्र अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही.
'लाल सिंह चड्डा' सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खान पुन्हा कधी मोठ्या पडद्यावर दिसणार याची चाहत्यांना प्रतिक्षा होती. आता लवकरच आमिर खानही कमबॅक करणार आहे. मात्र तो कोणत्या सिनेमातून कमबॅक करेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.