बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कायमच चर्चेत असतो. आमिर त्याच्या बॉलिवूडमधील करिअरबरोबरच पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत राहिलेला आहे. आता आमिरच्या एका वक्तव्याने लक्ष वेधून घेतलं आहे. "मी खूप रोमँटिक आहे. हवं तर माझ्या दोन्ही बायकांना विचारा", असं आमिर एका कार्यक्रमात म्हणाला. त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
आमिर खानने लेक जुनैद खानच्या आगामी सिनेमा 'लव्हयापा'च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला हजेरी लावली होती. यादरम्यान त्याने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. आमिरला या कार्यक्रमात प्रेमाबद्दल असलेले त्याचे विचार मांडण्यासाठी सांगण्यात आलं होतं. यावेळी त्याने स्वत:ला रोमँटिक असल्याचं सांगितलं.
काय म्हणाला आमिर खान?
"खरं तर मी खूप रोमँटिक आहे. खरंच मी खूप रोमँटिक आहे. हे ऐकल्यानंतर तुम्हाला हसू येईल पण, तुम्ही याबद्दल माझ्या दोन्ही पत्नींना विचारू शकता. मी रोमँटिक असल्यामुळे माझे आवडते सिनेमेही रोमँटिक आहेत. माझा खऱ्या प्रेमावर विश्वास आहे. जसजसे आपण मोठे होतो तसे प्रेमाची व्याख्या बदलत जाते. १८ वर्षांचे असताना तुमच्यात वेगळा जोश आणि भावना असतात. त्यानंतर हळूहळू तुम्ही लोकांना ओळखू लागता. स्वत:ला ओळखू लागता आणि आयुष्य काय आहे हे कळते".
दरम्यान, आमिरचा लेक जुनैद खान यानेदेखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेक्षेत्र निवडलं आहे. गेल्यावर्षी महाराज या सिनेमातून त्याने पदार्पण केलं. आता 'लव्हयापा' सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत श्रीदेवीची लेक खुशी कपूर दिसणार आहे. 'लव्हयापा' सिनेमा ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे