मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खान (Aamir Khan) काही वर्षांपासून पडद्यावरुन गायब आहे. २०२२ साली त्याचा 'लाल सिंह चड्डा' सिनेमा आपटला आणि आमिर गायबच झाला. हा सिनेमा फ्लॉप झाल्याचं त्याला प्रचंड दु:ख झालं होतं. कारण या सिनेसासाठी त्याने अनेक वर्ष मेहनत घेतली होती. आता हळूहळू आमिर पुन्हा सक्रीय होत आहे. नुकतंच त्याने एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यामध्ये त्याने सिनेमा फ्लॉप झाला की तो काय करतो याचा खुलासा केला आहे.
एबीपी न्यूजच्या इव्हेंटमध्ये आमिर खान उपस्थित होता. यावेळी तो म्हणाला, "जेव्हा माझे चित्रपट फ्लॉप होतात तेव्हा मला खूप दु:ख होतं. सिनेमा बनवणं कठीण आहे आणि कधीकधी गोष्टी ठरवल्या तशाच होत नाहीत. लाल सिंह चड्डा सिनेमात माझं काम जरा जास्त चांगलं झालं. पण टॉम हँक्स सारखं काम मला करत आलं नाही."
तो पुढे म्हणाला, "सिनेमा फ्लॉप झाल्यावर मी २-३ आठवड्यांसाठी नैराश्यात जातो. मग मी माझ्या टीमसोबत बसतो, चर्चा करतो. नक्की कुठे आणि काय चुकलं ते बघतो आणि त्यातून शिकतो. मी अपयशाला खूप महत्व देतो कारण यातूनच मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते."
आमिर खान आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमात दिसणार आहे. हा २००७ साली आलेल्या 'तारे जमीन पर' चा सीक्वेल आहे. यामध्ये जिनिलिया डिसूजाचीही भूमिका आहे. याशिवाय आणिर 'लाहोर १९४७' सिनेमाची निर्मितीही करत आहे ज्यामध्ये सनी देओल आणि प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत आहेत.