बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे आमिर खान (aamir khan). आमिरचे सिनेमे म्हणजे मनोरंजनाची हमखास गॅरंटी हे ठरलेलं. आमिरने अलीकडेच एबीपी नेटवर्क आइडियाज ऑफ इंडिया २०२५ मध्ये अनेक गोष्टींवर मनमोकळं मत व्यक्त केलं. काही दिवसांपूर्वी आमिरचा लेक जुनैद खानचा (junaid khan) 'लव्हयापा' (loveyapa) सिनेमा रिलीज झाला. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. त्यानिमित्त आमिर खानने त्याचं मत व्यक्त केलं.
लेकाचा सिनेमा फ्लॉप झाल्यावर आमिर काय म्हणाला
आमिरने या मुलाखतीत भाष्य केलं. जुनैदचा थिएटरमध्ये रिलीज झालेला पहिलाच सिनेमा अपयशी ठरल्याने आमिर दुःखी आहे. तो म्हणाला, "मला वाटतं की सिनेमा चांगला होता. जुनैदनेही चांगलं काम केलं. एक बाप म्हणून सिनेमाच्या रिलीजपूर्वी मी काळजीत होतो. त्या भावनेला मी शब्दात मांडू शकत नाही. सध्या जुनैद एका सिनेमाचं शूटिंग करतोय जो नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये रिलीज होईल. तो एक रोमँटिक सिनेमा आहे." अशा मोजक्या शब्दांमध्ये आमिरने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
सितारे जमीन पर कधी रिलीज?
याच मुलाखतीत आमिरने आगामी 'सितारे जमीन पर' कधी रिलीज होणार याविषयी त्याचं मत व्यक्त केलं. आमिरच्या म्हणण्यानुसार 'सितारे जमीन पर' सिनेमा याच वर्षी २०२५ मध्ये जून किंवा जुलैमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या मध्यमातून आमिर विनोदाच्या अंगाने खूप महत्वाच्या विषयाला स्पर्श करणार आहे. या सिनेमात आमिरसोबत अभिनेत्री जिनिलीया देशमुख झळकणार आहे. आमिरच्या चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता आहे.