आमिर खान (Aamir Khan) बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. पण असं असूनही त्याला थेरपीची गरज भासते. होय, आमिर आणि त्याची मुलगी आयरा खान दोघं मिळून थेरपी घेत आहेत. त्यांच्यातील बिघडलेलं नातं सुधारण्यासाठी ते बराच काळापासून थेरपिस्टकडे जातात. नुकतंच आमिरने एका मुलाखतीत याचा खुलासा केला.
आमिर खानने 'नेटफ्लिक्स इंडिया'च्या युट्यूब चॅनलवर आयरा खान आणि डॉ विवेक मूर्ती यांच्यासोबत बातचीत केली. अनेकांना वाटतं थेरपी घेणं म्हणजे मानसिक आजार असणं आहे. पण थेरपी घेतो यात लपवण्यासारखं काही नाही असं आमिरने स्पष्ट केलं. तो म्हणाला, "थेरपीमुळे खूप मदत होते. आयरामुळेच मी थेरपीकडे झुकलो. ज्यांना गरज आहे त्यांना मी स्ट्राँगली थेरपी सुचवेन. आयरा आणि मी जॉइंट थेरपी घेत आहोत ज्यामुळे आमच्यातील नात्यात सुधार आला आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या मुद्द्यांसाठी आम्ही थेरपिस्टकडे गेलो."
रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्येही आमिर खान म्हणाला होता की, "मी आजपर्यंत मुलांना फारसा वेळ देऊ शकलो नव्हतो याची मला खंत वाटते. म्हणूनच मी फिल्मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. करिअरवर जास्त लक्ष दिल्यामुळे आयरा, जुनैद आणि आजाद यांच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण मी जगूच शकलो नाही. आयरा तेव्हा डिप्रेशनचा सामना करत होती. तेव्हा तिला माझी गरज होती. जुनैद करिअरची सुरुवात करत होता. त्याने माझ्याशिवायच त्याचं आयुष्य जगलं आहे. जर या महत्वाच्या क्षणांमध्ये मी त्यांच्यासोबत नसेल तर काय उपयोग. आजाद आता ९ वर्षांचा आहे. पुढच्या तीन वर्षात तो टीनएजमध्ये असेल. त्याचं बालपण परत येणार नाही."
आमिर खानला पहिली पत्नी रिना दत्तापासून आयरा आणि जुनैद दोन मुलं आहेत. रीनापासून घटस्फोटानंतर त्याने किरण रावशी लग्न केलं. तत्यांना आजाद हा मुलगा आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने किरण रावपासूनही घटस्फोट घेतला.