'दंगल' सिनेमामुळे 'दंगल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी १९ वर्षीय सुहानी भटनागरचं (Suhani Bhatnagar) काही दिवसांपूर्वीच निधन झालं. तिने सिनेमात बबिता फोगाटच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. सुहानी डर्मेटोमायोसायटिस आजाराने त्रस्त होती. आमिर खानने (Aamir Khan) फरिदाबाद येथील तिच्या घरी जात कुटुंबियांचं सांत्वन केलं. या भेटीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
आमिर खान कालच फरिदाबाद येथील सुहानी भटनागरच्या घरी पोहोचला. तिचे आई वडील, भाऊ यांच्यासोबत आमिर खानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सुहानीची फोटो फ्रेम आहे. सुहानीच्या निधनानंतर झालेल्या शोकसभेत खऱ्या आयुष्यातील कुस्तीपटू बबिता फोगाटने दिसली होती. तिनेही सुहानीच्या आईवडिलांचं सांत्वन केलं होतं. आता आमिरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सुहानी भटनागरचा अपघात झाला होता ज्यात तिला गंभीर जखम झाली होती. यानंतर तिच्या शरीरावर सूज वाढत गेली. तसंच साईड इफेक्टमुळे तिच्या शरीरात पाणीही झालं होतं. तिला दिल्लीतील AIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दंगल सिनेमासाठी सुहानीची २५ हजार मुलींमधून निवड करण्यात आली होती. तिला सर्वजण 'दंगल गर्ल' म्हणूनच ओळखत होते.
सुहानीच्या आईने प्रतिक्रिया देताना सांगितले, "आमिर खान नेहमीच आमच्या संपर्कात असायचा. त्याने आम्हाला आयराच्या रिसेप्शनसाठी आमंत्रणही दिलं होतं. पण सुहानी तेव्हा फ्रॅक्चरमधून सावरत होती आणि ती प्रवास करु शकणार नव्हती म्हणून आम्ही जाऊ शकलो नाही. तसंच आम्ही आमिरला सुहानीच्या परिस्थितीबद्दल काहीच सांगितलं नाही. कारण आम्ही जर त्याला कल्पना दिली असती तर त्याने लगेच आम्हाला संपर्क केला असता."