आमिर, रजनीकांत, मोहनलाल राजमौलीच्या ‘महाभारत’मध्ये येणार एकत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2017 1:45 PM
दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा ‘बाहुबली २’ येत्या एप्रिलमध्ये रिलीज होत आहे. बाहुबलीच्या प्रदर्शनांनतर राजमौली आगामी चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. ...
दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा ‘बाहुबली २’ येत्या एप्रिलमध्ये रिलीज होत आहे. बाहुबलीच्या प्रदर्शनांनतर राजमौली आगामी चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. राजामौलीचा आगामी चित्रपट बाहुबलीप्रमाणेच भव्य दिव्य असणार असल्याच्या बातम्या असून यात मोठी स्टारकास्ट असेल असेही सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे यात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान व दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत व मोहनलाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असतील असे सांगण्यात येत आहे. राजमौली यांचा पुढील चित्रफट महाकाव्य महाभारतावर आधोरत असून याला तीन भागात तयार करण्याचा विचार करीत आहे. सध्या चर्चेत असलेल्या बातम्यानुसार पुढील वर्षीपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होऊ शकते. या चित्रपटासाठी राजमौली अनेक लोकांशी संपर्क साधत असल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलिवूड लाईफने दिलेल्या बातमीनुसार, राजमौली सध्या बाहुबलीच्या प्रमोशनात व्यस्त आहेत. मात्र ते महाभारत या चित्रपटाबद्दल उत्साहित आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी आमिर खान, रजनीकांत, मोहनलाल यांना आॅफर देण्याची तयारी त्यांनी चालविली आहे. मात्र कोणता स्टार कोणती भूमिका साकारेल हे अद्याप त्यांनी ठरविलेले नाही. सर्व गोष्टी राजमौलींच्या प्लॅननुसार झाल्यातर हे तीन दिग्गज एकाच चित्रपटात काम करताना दिसतील. समजा हे तिनही स्टार एकत्र आले तर आतापर्यंतचा सर्वांत भव्य चित्रपट ठरेल. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या बातम्यानुसार महाभारत या चित्रपटाचे बजेट ४०० कोटींचे असू शकते. निर्माते यात केवळ दाक्षिणात्य स्टार्सची उपस्थिती गृहित धरून आहेत. राजमौली आपल्या पद्धतीने काम करण्यावर विश्वास ठेवतात. बाहुबलीच्या पहिल्या भागासाठी त्यांना स्टार्सच्या डेटचा प्रॉब्लेम आला होता. मात्र आता बाहुबली चे दोन्ही भाग ज्या प्रकारे समोर आले आहेत त्याचा विचार केल्यास आमिर, रजनीकांत किंवा मोहनलाल त्यांना डेट देण्यासाठी अडचणी दर्शवितील असे वाटत नाही. काही दिवसांपूर्वी स्वत: आमिर खानने राजमौलींच्या या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘मी राजमौली यांचा मोठा चाहता आहे. ते महाभारत बनवणार असतील तर त्यात कृष्ण किंवा कणार्ची भूमिका करायला मला आवडेल. तसे मला कृष्ण बनायला सर्वाधिक आवडेल, असे आमिर म्हणाला होता. यावरून आमिरची अडचण तर दूर झाली आहे असेच म्हणावे लागेल.