महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन हिच्याबद्दल फेक न्यूज देणाऱ्या काही युट्यूब चॅनल्सच्या विरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावत कारवाईची मागणी केली.आज बच्चन कुटुंबाच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर कोर्टाने युट्यूब चॅनलला महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
बच्चन कुटुंबीयांनी दाखल केली होती याचिका रिपोर्टनुसार, दहा युट्यूब चॅनल्सना आराध्याबद्दलचे फेक व्हिडीओ ‘डी-लिस्ट’ आणि ‘डिॲक्टिव्हेट’ करण्याचे आदेश देण्याची विनंती बच्चन कुटुंबाने केली आहे. आराध्या सध्या अल्पवयीन आहे. हा तिच्या खासगी आयुष्याचा भंग असून बच्चन कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचं बच्चन कुटुंबाने आपल्या अर्जात म्हटले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश सी हरीशंकर यांच्या समोर आज २० एप्रिलला या प्रकरणावर सुनावणी पार पडली. दिल्ली उच्च न्यायालयाने संबंधित यूट्यूब चॅनल्सना आराध्याबद्दलच्या आक्षेपार्ह कंटेंटवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आराध्याच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबद्दल खोटे दावे करणारे सर्व व्हिडीओ व मजकूर हटवण्यासही सांगितलं आहे. एवढेच नाही तर कोर्टाने काहींना समन्सही पाठवले आहेत.
अशा प्रकरणांमध्ये YouTube ची जबाबदारी नाही का? लोकांची दिशाभूल करणारा मजकूर अपलोड करण्यापासून तुम्ही थांबवू नये का? आम्ही त्यांना व्यासपीठ देत आहोत, असे तुम्ही म्हणू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्या प्लॅटफॉर्मवर जे दाखवले जाईल त्यासाठी तुम्ही जबाबदार नाही.अशा प्रकारचा मजकूर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तत्काळ हटवून तो तत्काळ ब्लॉक करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.