'आशिकी' (Aashiqui) या चित्रपटातून डेब्यू करणारा दीपक तिजोरी (Deepak Tijori) दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावरून गायब होता. पण आता पुन्हा एकदा तो कमबॅक करतोय. 'इत्र' या सिनेमातून दीपक तिजोरीचं कमबॅक होतंय. साहजिकच या चित्रपटाच्या निमित्ताने हा चॉकलेटी हिरो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. एका ताज्या मुलाखतीत त्याने 'आशिकी' या सिनेमाबद्दल एक शॉकिंग खुलासा केला. हाेय, या चित्रपटात या सिनेमातील एक इमोशनल सीन महेश भट यांनी काढून टाकला होता. याचं कारण काय तर दीपक तिजोरी 'आशिकी'चा हिरो राहुल रॉयवर भारी पडला होता.
दीपक तिजोरीने सांगितलं, 'आशिकी' या चित्रपटात माझा आणि राहुल रॉयचा २ मिनिटांचा एक मोठा भावुक सीन होता. हा सीन शूट झाला आणि याचा फर्स्ट हाफ बघून महेश भट यांनी सीनचा सेकंड हाफ हटवण्याचा आदेश दिला. सुमारे ४५ सेकंदाचा सीन उरला होता. एक दिवस त्यांनी अख्खा सीनच सिनेमातून हटवला. मला काही कळेना. मी हिंमत करून महेश भट यांना याबद्दल विचारलंच. माझा सीन तुम्ही का कापला?, असा थेट प्रश्न मी त्यांना केला. यावर महेश भट यांचं उत्तर ऐकून मी हैराण झालो. मी तो सीन ठेवण्याचा प्रयत्न केला, तू बघितलंस ना. पण तू माझ्या हिरोपेक्षा चांगला परफॉर्म करणार असतील तर तो सीन चित्रपटात दिसणार नाहीच. माझा हिरो माझा हिरो आहे. चित्रपट हिट झाला की लोक हिरोवर प्रेम करतील, असं ते मला म्हणाले.
महेश भट यांचे ते शब्द नेहमीसाठी माझ्या मेंदूवर कोरले गेलेत. कधीही हिरोपेक्षा चांगलं काम करायचं नाही, जाणीवपूर्वक सीनचा लाईमलाईट चोरायचा नाही, हा धडा मी शिकलो. एकदा महेश भट मला व राहुलला गमतीत म्हणाले होते की, तुमच्यापैकी कोण लीड ॲक्टरचा रोल करतोय, हे तुम्ही आपआपसात ठरवून घ्या. अर्थातच मी मागे हटलो. कारण मी हिरोच्या मित्राच्या भूमिकेत होतो.