अभिनेता दीपक तिजोरीने निर्मात्याविरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे. 'जो जीता वही सिकंदर' आणि 'आशिकी' सारख्या सिनेमांतून लोकप्रिय झालेल्या दीपकने कोप्रोड्युसर मोहन नादरविरोधात अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. २.६ कोटींची फसवणुक केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दीपक तिजोरीच्या तक्रारीनंतर अंबोली पोलिसांनी मोहन नादरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एएनआयच्या रिपोर्टनुसार, मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 420 आणि 406 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दीपक तिजोरीने १० दिवसांपूर्वी मोहन नादरकडून पैसे परत न मिळाल्याने तक्रार दाखल केली होती. मोहन नादरने शूट लोकेशनसाठी दीपककडून २.६ कोटी रुपये घेतले होते. २०१९ मध्ये 'टिप्सी' या सिनेमाचा करार केला होता. मोहन याने ही फिल्म पूर्ण केलीच नाही आणि दीपकचे २.६ कोटी रुपयेही परत दिले नाहीत. जेव्हा दीपकने पैसे मागितले तेव्हा मोहनने चेक दिला मात्र तो बाऊंस झाला, अंबोली पोलिसांनी अद्याप मोहन नादरला अटक केलेली नाही, पोलिस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दीपक याने तक्रारीत म्हटले आहे की, मोहन नादरने सप्टेंबर २०१९ मध्ये लंडन येथे फिल्म शूट करण्यासाठी पैसे घेतले होते, परत करण्याचं वचन घेत मी त्याला पैसे दिले मात्र काही ना कारणं देत त्याने अद्याप पैसे परत केलेले नाही. अनेकदा चेकही बाऊंस झाला.
दीपकने 1990 साली महेश भटच्या 'आशिकी' मधून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर 'जो जिता वही सिकंदर', 'खिलाडी', 'कभी हा कभी ना', 'बादशाह' सारख्या चित्रपटांतून त्याने काम केले. अभिनयाव्यतिरिक्त त्याने 'ऊप्स', 'फरेब', 'फॉक्स' या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. आगामी 'इत्तर' या सिनेमातून दीपक पुन्हा अभिनयात कमबॅक करत आहे. यामध्ये अभिनत्री रितूपर्ण सेनगुप्ता देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.