Join us

'आशिकी' फेम अनु अग्रवालने अपघाताच्या आठवणी केल्या ताज्या, म्हणाली, "मृत्यूच्या दारात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 8:53 AM

एका अपघाताने अभिनेत्रीचं आयुष्यच बदलून गेलं.

ब्लॉकबस्टर चित्रपट 'आशिकी' फेम अभिनेत्री अनु अग्रवाल (Anu Aggarwal) एका रात्रीत स्टार झाली होती. १९९० साली आलेल्या तिच्या या सिनेमाने धुमाकूळ घातला होता. मात्र तिच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. १९९९ साली तिचा भीषण अपघात झाला आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. २९ दिवस ती कोमात होती. अपघाताच्या २४ वर्षांनी तिने पुन्हा त्या भयानक आठवणींना उजाळा दिला आहे.

ईटाईम्सशी संवाद साधताना अनु अग्रवाल म्हणाली, "जेव्हा मी कोमात होते तेव्हा माझ्या जीवनमरणाचा प्रश्न होता. मी कोमातून बाहेर जरी आले असते तरी मला पॅरालिसिस होण्याची शक्यता होती. एक महिन्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी पलंगावर अक्षरश: मृतावस्थेत असल्यासारखी होते. माझं अर्ध शरीर निकामी झालं होतं. हे बघून मी थरथर कापायला लागले. पण मी हार मानली नाही कारण मी मृत्यूच्या दारातून परत आले होते."

ती पुढे म्हणाली, "अपघातातून सावरत मी अध्यात्माच्या मार्गाला लागले. २००१ साली मी संन्यास घेतला. इतकंच नाही तर मी टक्कलही केलं. मी आयुष्यात खूप बदल केले. माझ्याकडे फक्त एक बॅग असायची. मी ह्युमन सायकॉलॉजी आणि माईंडबाबत वाचायला लागले. अपघातानंतर माझा चेहरा विद्रुप झाला होता. मी मेकअप करणंही विसरले होते.  माझे तसे फोटो व्हायरल झाले होते. मात्र हळूहळू मी या धक्क्यातून स्वत:ला बाहेर काढलं."

अनु अग्रवाल आता सोशल मीडियावर सक्रिय असते. तसंच ती योग प्रशिक्षणही देते. तिचे इन्स्टाग्रामवर १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाअपघात