'बिग बॉस 16'मुळे ( Bigg boss 16) घराघरात पोहोचलेला लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणजे अब्दु रोजिक (abdu rozik) . उत्तम टास्क खेळण्याची पद्धत आणि गोड बोलण्याची पद्धत यामुळे अब्दू या पर्वातील लाडका स्पर्धक ठरला. विशेष म्हणजे या शोसोबतच तो सलमान खानच्या (salman khan) 'किसी का भाई किसी की जान' (kisi ka bhai kisi ki jaan) या सिनेमात झळकणार होता. त्यामुळे त्याने या सिनेमाच्या काही भागांचं चित्रीकरणही केलं होतं. मात्र, असं असतानादेखील त्याला या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. याविषयी त्याने अलिकडेच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
सलमान खानचा किसी का भाई किसी की जान हा सिनेमा २१ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात सलमानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकल्या आहेत. त्यांच्यासोबतच यात अब्दूदेखील झळकणार होता. मात्र, ऐनवेळी त्याच्या सीनला कात्री लावण्यात आली.
“मी या चित्रपटात काम करणार होतो. त्यासाठी मी सिनेमातील काही भागांचं चित्रीकरणही केलं होतं. पण माझे सीन सिनेमाच्या कथेशी जुळत नव्हते. त्यामुळे निर्माते-दिग्दर्शक यांना माझे सीन चेंज करायचे होते. त्यासाठी मला पुन्हा शुटिंग करावं लागणार होतं.मात्र, त्यावेळी मी बिग बॉसच्या घरात होतो. त्यामुळे मला सिनेमाच्या शुटिंगसाठी बाहेर पडण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे मी या सिनेमासाठी पुन्हा शुटिंग करु शकलो नाही. परिणामी, माझे आधीचे नको असलेले सीन टीमने चित्रपटातून काढून टाकले, असं अब्दू रोजिक म्हणाला.
दरम्यान, सलमानच्या किसी का भाई किसी की जान या सिनेमाची प्रदर्शनापूर्वी प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र, प्रत्यक्षात हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर फारशी जादू करु शकला नाही.